दिल्लीचे अन्न व नागरी मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट

राज्यातील योजनांच्या अंमलबजावणीची घेतली माहिती

मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी विधानभवनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, तसेच योजना प्रभावीपणे राबविण्या संदर्भात श्री.सिरसा यांनी ‘आनंदाचा शिधा’, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘शिवभोजन थाळी योजना’ यांसारख्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांची माहिती घेतली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे स्वरूप, उद्दिष्टे, लाभार्थ्यांची संख्या, तसेच या योजनांमुळे गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मिळणाऱ्या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषतः महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या माध्यमातून राज्यात महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्टया सक्षम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी उपक्रमामार्फत अल्पदरात सकस भोजन देऊन गरजू नागरिकांना मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही राज्यांमध्ये अन्न व नागरी पुरवठा क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण करून परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच भविष्यात एकमेकांच्या योजनांमधील चांगले घटक समजून घेऊन त्याची अंमलबजावणी अन्य राज्यांमध्ये देखील कशी करता येईल, यावर चर्चा झाली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल उपस्थित होत्या.

०००००००

राजू धोत्रे/विसंअ