‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात !

नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देताना राज्य सरकारने निरामयी महाराष्ट्रासाठी विविध योजना आणि उपक्रमांची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. समाजातील सर्वच घटकांना या योजनांच्या लाभाच्या परिघामध्ये सामावून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करत आहे. मात्र आर्थिक दुर्बल घटकातील गरजू रुग्णांची बऱ्याचदा कुचंबणा होत असते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जाणिवेने सुरू केलेला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’!

14 हजार रुग्णांना 128 कोटींची मदत !

खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पद्धतीचा अवलंब करून गुंतागुंतीचे आजार असलेल्या रुग्णांना बरे केले जाते परंतु आर्थिकदृष्ट्या  दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना ही महागडी उपचार पद्धती परवडत नाही, ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’ स्थापन करण्यात आला. या माध्यमातून हृदयविकार, यकृत, हृदय व गुडघा प्रत्यारोपण, लहान बालकांचे आजार, कर्करोगाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचारांसाठी अर्थसहाय्य करण्यात येते. या उपक्रमात वीस गंभीर स्वरूपाच्या आजारांचा समावेश असून 1 जानेवारी 2025 ते जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला रुग्णांकडून प्राप्त झालेले 14 हजार 651 प्रस्ताव मंजूर करण्यात आले. या रुग्णांना एकूण 128 कोटी 66 लाख 68 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.  यापूर्वी करण्यात आलेल्या मदतीपेक्षा ही मदत सर्वाधिक आहे. यात मेंदूशी संबंधित आजाराचे 2 हजार 709 अर्ज मंजूर करण्यात आले असून त्याच्या उपचारासाठी रुग्णांना 22 कोटी 26 लाख 84 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या आर्थिक मदतीमुळे असंख्य बालके, स्त्रिया व वृद्ध गंभीर आजारातून मुक्त होत असून आनंदी जीवन जगत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष असंख्य आर्थिक दुर्बलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत विविध प्रकारच्या दुर्धर आजारांवरील उपचारांकरिता रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात असंख्य अर्ज येतात. अशा रुग्णांच्या अर्जाची योग्य वेळेत पडताळणी व तपासणी करून त्यांना लगेच मदत उपलब्ध करून देण्यात येते. या कक्षाअंतर्गत एका कार्यकारिणी समितीची स्थापन करण्यात आली असून यात रुग्णालयाचे अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी, विषयतज्ज्ञ, कक्ष समन्वयक आदींचा समावेश करण्यात आला आहे. उपचारादरम्यान रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांच्या सुविधेसाठी (1800 123 2211) टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून 24 x 7 सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारांसाठी अर्ज सादर करण्यापासून ते मदत मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व पारदर्शक करण्यात आली आहे.

आजारनिहाय रूग्णांना केलेली मदत

अ.क्र. आजाराचे नाव मंजूर अर्ज संख्या मंजूर रक्कम (रू)
1. मेंदुशी संबंधीत आजार 2709 22 कोटी 26 लाख 84 हजार
2. अपघात शस्त्रक्रिया 1983 18 कोटी 31 लाख 82 हजार
3. कॅन्सर शस्त्रक्रिया 1861 18 कोटी 2 लाख 80 हजार
4. हिप रिप्लेसमेंट 1658 16 कोटी 21 लाख 94 हजार
5. ह्रदयाशीसंबंधित आजार 1509 14 कोटी 23 लाख 94 हजार
6. गुडघा प्रत्यारोपण 804 4 कोटी 4 लाख 15 हजार
7. लहान बालकांच्या शस्त्रक्रिया 782 6 कोटी 32 लाख 91 हजार 500
8. कॅन्सर केमोथेरपी/रेडिएशन 699 3 कोटी 59 लाख 35 हजार
9. रस्ते अपघात 578 4 कोटी 69 लाख 85 हजार
10. नवजात शिशुंचे आजार 572 3 कोटी 24 लाख 11 हजार
11. डायलिसिस 380 1 कोटी 89 लाख 66 हजार 100
12. किडनी ट्रान्सप्लांट 329 6 कोटी 42 लाख 75 हजार
13. लिगामेंट (अस्थिबंधन) 141 70 लाख 69 हजार
14. कॅन्सर 117 1 कोटी 55 हजार
15. बोन मॅरो ट्रान्सप्लांट 114 2 कोटी 25 लाख 65 हजार
16. वर्न (भाजलेले रूग्ण) 96 51 लाख 90 हजार
17. लिव्हर ट्रान्सप्लांट 69 1 कोटी 35 लाख 50 हजार
18. कॉकलियर इम्प्लांट 58 1 कोटी 12 लाख 50 हजार
19. ह्रदय प्रत्यारोपण 12 16 लाख 50 हजार
20. विशेषबाब प्रकरण 187 1 कोटी 81 लाख 53 हजार 500
  एकूण 14651 128 कोटी 66 लाख 68 हजार

 

 एफसीआरए प्रमाणपत्र मिळवणारे एकमेव राज्य

परदेशात राहून आपल्या राज्यातील गरजूंप्रती सेवाभाव ठेवणारे अनेक नागरिक देणगी देण्यास इच्छुक असतात. परंतु यात निर्माण होणाऱ्या अडथळ्यांमुळे ते सहज शक्य होत नसे. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवून, देणग्या सुलभतेने स्वीकारता याव्या यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना यश मिळाले व केंद्र सरकारकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला एफसीआरए प्रमाणपत्र प्राप्त झाले. आता थेट परदेशातील देणग्या मिळवणे महाराष्ट्र सरकारला शक्य झाले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षासाठी परकीय योगदान नियमन कायदा (Foreign Contribution Regulation Act) प्रमाणपत्र मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कक्षाला परदेशातून देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली असून या निर्णयामुळे राज्यातील अधिकाधिक रुग्णांना जीवनदान मिळत आहे. मुख्यमंत्री सहायता निधीच्या  माध्यमातून आता देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही मदत मिळून अधिकाधिक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील सामाजिक तसेच आरोग्यविषयक सेवांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मदतीचे द्वार खुले झाले आहे.

 प्रत्येक जिल्ह्यात सहाय्यता कक्ष

गरजू रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याच जिल्ह्यातून किंवा स्थानिक पातळीवर आरोग्यविषयक उपचार मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून गंभीर आजारांवरील उपचारांसाठी तातडीने आर्थिक मदत मिळवून दिली जाते. या सुविधेमुळे रुग्णांच्या कुटुंबियांचा वेळ व प्रवासाच्या इतर आर्थिक खर्चाची बचत होण्यास  मदत होत आहे. जिल्हा पातळीवर नोंदणीची स्वतंत्र ऑनलाईन प्रणाली विकसीत करण्यात आली असून या निर्णयामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 वीस गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत बालकांवर होणारी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, बोन मॅरो, गुडघा व हाताचे प्रत्यारोपण तसेच हीप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघातातील रुग्णांवर शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, कर्करोग, अस्थिबंधन, बर्न रुग्ण, विद्युत अपघातातील रुग्ण, नवजात शिशुंचे आजार व लहान बालकांवर शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे.

 अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे

अर्थसहाय्यासाठी रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची प्रथम खात्री करावी. त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो पाठवणे बंधनकारक आहे. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, तहसील कार्यालयाने दिलेला (उत्पन्न 1.60 लाखापेक्षा कमी असावे) उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे रेशन कार्ड, आधार कार्ड, संबंधित आजाराचा तपासणी अहवाल, अपघातग्रस्त रुग्णांसाठी एफआयआर रिपोर्टची प्रत, प्रत्यारोपण रुग्णासाठी शासकीय समितीच्या मान्यतेची प्रत सादर करणे आवश्यक आहे. अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी रुग्ण महाराष्ट्राचा रहिवासी असावा, लहान बालकांवर उपचारांसाठी आईचे आधार कार्ड आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

https://cmrf.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती उपलब्ध असून पीडीएफ स्वरूपातील अर्ज मिळवण्यासाठी व आवश्यक कागदपत्रांसह भरलेला अर्ज aao.cmrf-mh@fov.in या मेलवर सादर करावा.

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला प्राप्त होणाऱ्या निधीचा राज्यातील गरजू रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी अधिक प्रभावीपणे वापर करण्यात येत असून गरजू रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया व उपचार मिळणे शक्य झाले आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात आशेचा किरण असलेला हा उपक्रम आणि तो राबवणारी यंत्रणा अधिक सक्षम व गतिशील करण्यावर शासनाचा भर आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देण्याची सरकारची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे.

श्रीमती प.अ.धारव

सहायक संचालक,(नागपूर विभाग)