विधानपरिषद कामकाज

लोणार सरोवर, कोकण किनारा व खुलताबाद येथील पर्यटन प्रकल्पांना गती – पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी शासन स्तरावर महत्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. लोणार सरोवराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने 91.29 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिली असून, युनेस्को मानांकनासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानपरिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना राज्यमंत्री नाईक बोलत होते.

कोकण किनाऱ्यावर पर्यावरणपूरक कृत्रिम भूपृष्ठ (आर्टिफिशियल रिफ) तयार करण्यासाठी INS गुलजार युद्धनौका वापरण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगून राज्यमंत्री नाईक म्हणाले की, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती समुद्रात शिरवली जाणार आहे. त्याआधी नौकेची सफाई करून पर्यावरणपूरक हस्तांतरण होणार आहे.

खुलताबाद येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची तसेच अजिंठा-वेरूळ परिसरात पायाभूत सुविधा उभारण्याची मागणी असून, पर्यटनाच्या दृष्टीने ही ठिकाणे समृद्ध करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचेही राज्यमंत्री नाईक यांनी सांगितले.

०००००