राज्यात यावर्षी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण -क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ

शासनाच्या निर्णयामुळे गोविंदांमध्ये उत्साह

मुंबई, दि. १८ : दहीहंडीमध्ये मानवी मनोरे रचण्याच्या पारंपरिक प्रथेस साहसी खेळाचा दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेवून सन २०२५ मधील  दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने  क्रीडा विभागाकडून राज्यातील दीड लाख गोविंदाना शासकीय विमा कंपनीमार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती  क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना क्रीडामंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याकरिता अंदाजे १ कोटी २५ लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल. सन २०२३ व २०२४ मध्ये प्रत्येकी ७५ हजार गोविंदांना ओरीएंटल इन्शुरन्स कंपनीमार्फत विमासंरक्षण देण्यात आले होते.

यावर्षी गोविंदांच्या संख्येत दुपटीने  वाढ करण्यात आली आहे.

दहीहंडीमध्ये मनोरे रचताना  तरुणांनी आपली व इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहनही क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी  यावेळी केले आहे.

00000

निलेश तायडे/विसंअ