विधानसभा लक्षवेधी

सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता देणारजलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. १८ :- सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्पास राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता घेऊन या प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली जाईल, असे जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य किसन वानखेडे यांनी सहस्त्रकुंड बहुउद्देशीय प्रकल्प संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली

जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी सांगितले,की या प्रकल्पाच्या प्रथम सर्वेक्षणामध्ये १४ गावे बुडीत जात होती तर ९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते. या प्रकल्पाच्या सुधारित सर्वेक्षणानुसार आणखी एखादे गाव बुडीत क्षेत्रात जाईल अशी स्थिती आहे. तर सुधारित सर्वेक्षणानुसार ३२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता निर्माण होणार असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

 

मुंबई – अहमदाबाद रेल्वे मार्गाचे भूसंपादन नियमानुसार-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १८:  मुंबई- अहमदाबाद या जलदगती रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.  त्यासाठी पालघर जिल्ह्यात  भूसंपादनही करण्यात येत आहे. हे भूसंपादन प्रचलित कायदे आणि नियमानुसार असून याबाबत कुठेही आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक होऊ दिली जाणार नाही, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

यासंदर्भात सदस्य राजेंद्र गावित यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात आदिवासी बांधवांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा असे निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल. याबाबत बैठकीचे आयोजनही करण्यात येईल.

०००

निलेश तायडे/विसंअ

 

बनावट शासन निर्णय; गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई दि.१८:- अहिल्यानगर जिल्ह्यात बनावट शासन निर्णयाच्या आधारे केलेल्या कामासंदर्भात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई, हलगर्जीपणा केलेल्या संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई  केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात लेखाशीर्ष २५१५ १२३८ मध्ये बनावट शासन निर्णयाच्या आधारे झालेल्या कामांच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनीं सांगितले, बनावट शासन निर्णयाद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यात लेखाशीर्ष २५१५ १२३८ मधून ६ कोटी ९५ लाखाची ४५ कामे मंजूर केल्याचे निदर्शनास आले.  ही बाब लक्षात येताच याबाबत तातडीने  संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले. गुन्हे दाखल करण्यास स्मरणपत्र पाठवूनही ज्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्यास विलंब केला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच बनावट शासन निर्णय संदर्भात चौकशी करून दोषींवर गुन्हा दखल केला जाईल.

००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

 

शिक्षक पदभरतीत राखीव प्रवर्गावर अन्याय होऊ देणार नाही – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १८ : सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत असणाऱ्या सहाय्यक आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्यात येते. प्रमाणित केलेल्या बिंदू नामावलीच्या आधारेच नियुक्ती प्राधिकारी आरक्षणनिहाय पदभरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर नोंदवत असतात. मागील शिक्षक भरती प्रक्रिया दोन टप्प्यात राबविण्यात आली.  यामध्ये बिंदू नामावली नुसारच भरती करण्यात आली आहे. भविष्यातही शिक्षक पद भरतीमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

शिक्षक पदभरती बाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

या सूचनेच्या उत्तरात शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, बिंदू नामावलीच्या प्रस्तावात काही त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करून प्रस्ताव फेर सादर करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना सूचित करण्यात येते. शिक्षक पदभरतीची प्रक्रिया मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात एकूण २१ हजार ८३९ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १० हजार ८५६ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली. पदभरतीच्या दोन्ही टप्प्यात विमुक्त भटक्या जमाती या प्रवर्गात विमुक्त जाती प्रवर्गात १४९८, भटक्या जमाती (ब) ७२७, भटक्या जमाती (क) ८२१, भटक्या जमाती (ड) ६७२ पदे आहेत.

तसेच या दोन्ही टप्प्यात ३२ हजार ६९५ पदांची जाहिरात देण्यात आली. विजाभज प्रवर्गासाठी ३ हजार ५९६ पदे उपलब्ध होणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ३ हजार ७१८ पदे उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या प्रवर्गावर अन्याय झाला असल्याचे दिसून येत नाही, असेही शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

000

निलेश तायडे/विसंअ

 

मालेगाव येथील शाळेच्या अनियमिततेची एसआयटीमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १८: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शाळेच्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. या प्रकरणात अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालेगाव येथील या प्रकरणाची सखोल चौकशी विशेष चौकशी समिती (एसआयटी) मार्फत करण्यात येईल. चौकशीअंती दोषी आढलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.

या संदर्भात सदस्य संग्राम जगताप यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण सहसंचालक आणि उपसंचालक यांच्या माध्यमातून प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या प्राथमिक चौकशीत अनियमितता झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी शिक्षण विभागातील विविध अनियमिततेच्या प्रकरणात गठित राज्यव्यापी विशेष चौकशी समितीमार्फत करण्यात येईल.

00000

निलेश तायडे/विसंअ/

 

आरे वसाहतीच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई – दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. १८ : गोरेगाव (पूर्व) भागात आरे दुग्ध वसाहत जागेवर ३० शासकीय तबेले, वसाहती आहेत. या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिका, पोलिस यांना देण्यात आल्या आहेत. या जागेवर अतिक्रमण होऊ देणार नाही, असे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत लक्षेवधी सूचनेच्या उत्तरात स्पष्ट केले.

या वसाहतीबाबत सदस्य अनंत नर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

श्री अतुल सावे म्हणाले, या वसाहतीच्या जमिनीवर अवैध धंदे होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासाठी पोलिसांना गस्त वाढविण्यात आली असून सुरक्षा रक्षक वाढविण्यात आले आहे. या वसाहतीच्या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी सोबत बैठकीचे आयोजनही करण्यात येईल. त्या जमिनीवरील अतिक्रमणावर यापूर्वीदेखील कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच बैठकही घेण्यात आलेली आहे.

00000

निलेश तायडे/विसंअ/

 

नाशिक पाणीपुरवठा पाईपलाईन कामाची विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १८: नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गंगापूर धरण पंपिंग स्टेशन ते १२ बंगला जलशुद्धीकरण केंद्र पर्यंत पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामामध्ये अनियमितता झाली असल्यास विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य ॲड राहुल ढिकले यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, या प्रकरणामध्ये कोणत्याही निविदा अटींचे उल्लंघन झाले नसून मान्यताप्राप्त उत्पादन कंपनीकडूनच भारतीय मानकांनुसार गुणवत्तापूर्ण पाईप खरेदी करण्यात आले आहे. हे काम सिंहस्थ सन २०२७- २८ पूर्वी होणे गरजेचे असल्याने २०२५ – २६ आर्थिक वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.

000

निलेश तायडे/विसंअ

 

मागाठाणे ते गोरेगाव रस्ता पूर्ण करणार- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १८: मागाठाणे ते गोरेगाव रस्ता ३६.७ मीटर रुंदीचा आहे. हा रस्ता पश्चिम द्रुतगती मार्गास समांतर असून १९९१ च्या विकास नियोजनातील आहे. या रस्त्याचा विषय मुख्यमंत्री वॉर रूममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सर्व अडचणींवर मात करीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

या रस्त्याच्या कामाबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, हा रस्ता मुख्यमंत्री वॉर रूममध्ये असल्यामुळे याबाबत बैठक घेण्यात येईल. हा रस्ता ५.२ किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्यापैकी २.६० किलोमीटर रस्ता विकसित झालेला आहे. या रस्त्यावरील २५० मीटर लांबी अतिक्रमित भूभाग असून एकूण ३१० बांधकामे बाधित होत आहेत. त्यानुसार सद्यस्थितीत बाधितांचे अंतिम परिशिष्ट दोन पारित करण्यात आले आहे. या बाधितांना एकूण ४७ सदनिका देण्याकरिता सोडत करण्यात आली आहे. उर्वरित सदनिका हस्तांतरण करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

००००

निलेश तायडे/विसंअ

 

धार्मिक स्थळाच्या व्यतिरिक्त केलेल्या बांधकामाची तपासणी करणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १८: नागपूर शहरातील मौजा बाभूलखेडा येथील धार्मिक स्थळाच्या व्यतिरिक्त केलेल्या बांधकामाची नागपूर महापालिकेमार्फत तपासणी करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, येथील धार्मिक स्थळाचे बांधकाम १९८७ पूर्वीपासूनचे आहे. या धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांकडून तक्रारी प्राप्त आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने नागपूरमहानगर पालिका स्तरावर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

000

निलेश तायडे/विसंअ

 

नाला रुंदीकरणात बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन –नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. १८: मानखुर्द (पश्चिम) ते ट्रॉम्बे परिसरातील ३१० मीटर लांबीच्या नाल्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. झोपड्या असलेल्या ठिकाणी १३५२ मीटर लांबीच्या नाल्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या नाला रुंदीकरणात बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी  विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य अमित साटम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, या रुंदीकरणामधील झोपड्यांचे निष्कासन व नाला रुंदीकरण दोन टप्प्यात करण्याची कार्यवाही सुरू आहे. एकूण ११४० झोपड्यांपैकी २५० झोपड्यांचे सुधारित अंतिम परिशिष्ट २ प्रदर्शित करण्यात आले आहे. यामधील पात्र ४४ झोपडीधारकांना पर्यायी सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उर्वरित झोपडीधारकांचे परिशिष्ट २ तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेस प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येत असून अहवालानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

 

00000

निलेश तायडे/विसंअ/

  

 इमारतींच्या पुनर्विकासासाठी नियमातील तफावत दूर करणार उद्योग राज्यमंत्री इंद्रानील नाईक

मुंबई, दि. १८: औद्योगिक वसाहतीच्या जागांवर इमारतींचा पुनर्विकास करताना नगरविकास विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमांमध्ये असलेली तफावत दूर करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी  विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील इमारतींच्या पुनर्विकासबाबत सदस्य राजेश मोरे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

उद्योग राज्यमंत्री श्री नाईक म्हणाले, डोंबिवली औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण ६१९ भूखंड रहिवासी प्रयोजनासाठी आहेत. येथील २०० इमारतींना महानगरपालिकेमार्फत ‘ स्ट्रक्चरल ऑडिट’ साठी नोटीस देण्यात आलेले आहे. यापैकी १७ इमारतींनी स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण केले आहे. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षणाची कार्यवाही तातडीने करण्यात येईल. अशा इमारतींच्या पुनर्विकासबाबत विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावली २०२३ मधील तरतुदीच्या अधीन राहून परवानगी देण्याची कार्यवही करण्यात येईल.

यामध्ये आर ५६ व 98 या दोन इमारतींमध्ये स्वयं पुनर्विकासाची मागणी आहे.

00000

निलेश तायडे/विसंअ/

 

प्रेमनगर एस.आर.ए. गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी करणारगृहराज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. १८:- प्रेमनगर एस.आर. ए. गृहनिर्माण संस्था विलेपार्ले (पश्चिम) मुंबई या गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी केली जाईल, असे गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य मुरजी पटेल यांनी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत  सदस्य  पराग अळवणी यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले, प्रेमनगर एस.आर. ए. गृहनिर्माण संस्था विलेपार्ले (पश्चिम) मुंबई या गृहनिर्माण प्रकल्पाच्या कामाला  २०१७ मध्ये परवानगी देण्यात आली, पण कामाला सुरुवात झाली नाही. २०२४ मध्ये विकासक बदलला. मात्र झोपडपट्टीधारकांना देय असलेले भाडे संबधित विकासकाकडून मिळाले नाही. पात्र झोपडपट्टी धारकांच्या थकित भाड्याची रक्कम प्रमाणित लेखा परीक्षकाद्वारे अंतिम करून विकासकाकडून वसूल करण्यात येईल, असेही राज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या संदर्भात वैयक्तिकरित्या दाखल झालेल्या एफआयआर बाबतही चौकशी केली जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवताना सोसायटींशी संबधित नसलेल्या व्यक्तीवर बंधने घालावी लागतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/वि.सं.अ

 

कोल्हापूरच्या आयटी पार्कसाठी जागा उपलब्ध करून देणार – उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक

मुंबई, दि. १८: कोल्हापूरमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी शासन सकारात्मक आहे. यासाठी कोल्हापूर, जिल्हाधिकारी यांच्याकडे 34.76 हेक्टर जागेची मागणी करण्यात आली आहे. या जागेबाबत लवकरच संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन जागा उपलब्धतेसाठी कार्यवाही करण्यात येईल, असे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

कोल्हापूर आयटी पार्क जागेबाबत सदस्य राजेश क्षीरसागर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यमंत्री श्री. नाईक म्हणाले, आयटी पार्कसाठी सध्या असलेली जागा कृषी विद्यापीठाची असल्याने त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यांनी निवडलेली करवीर तालुक्यातील जागा वन विभागाची आहे. ही जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकारी, कोल्हापूर व वनविभाग स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.

 

00000

निलेश तायडे/विसंअ/