मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना

गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व आपत्तीग्रस्त नागरिकांना वेळेवर मदत पोहोचवण्याच्या हेतूने कार्यरत आहे. ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, राज्य शासनाच्या सामाजिक दायित्वाचा ठोस पुरावा म्हणून उदयास आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात या कक्षाचे उद्घाटन २६ जानेवारी २०२५ रोजी गणराज्य दिनी करण्यात आले असून, या माध्यमातून गरजूंना थेट जिल्हास्तरावर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून पूर, दुष्काळ, आगसदृश्य नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत केली जाते. तसेच, हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात शिशूंचे आजार, मेंदू विकार, डायलिसीस अशा महागड्या उपचारांची गरज भासणाऱ्या रुग्णांना मदत मंजूर केली जाते. ३ जून २०२५ रोजी कुरखेडा येथील श्री. अविनाश दुबे यांना हृदयविकारावरील उपचारांसाठी एक लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली, हे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे उदाहरण आहे.

या निधीअंतर्गत वैयक्तिक मदतीबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपातील मदत दिली जाते. शैक्षणिक वा वैद्यकीय संस्थांच्या इमारती बांधण्यासाठी, तसेच सामाजिक-सांस्कृतिक चर्चासत्रे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी देखील निधी दिला जातो. जातीय दंगलीत, दहशतवादी हल्ल्यात किंवा इतर अपघातांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना आणि जखमी नागरिकांना मदतीस पात्र ठरवले जाते.

या कक्षामार्फत खालील योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत — आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना (MSPJY), राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK), पोलीस कुटुंब आरोग्य योजना (MPKAY), राज्य कामगार विमा योजना (ESIC), आणि धर्मादाय रुग्णालय योजनांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत आर्थिक मदतीसाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ-टॅग फोटो, वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक (खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्रमाणित), चालू आर्थिक वर्षाचा तहसीलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला (रु. १.६० लाख पेक्षा कमी असावा), रुग्णाचे व बालक असल्यास आईचे आधारकार्ड, रेशनकार्ड, आजारासंदर्भातील निदान व उपचार कागदपत्रे आणि अपघातप्रकरणी एफआयआर यांचा समावेश आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती (ZCC) यांची कागदपत्रे आवश्यक आहेत. ऑनलाईन अर्ज केल्यास सर्व कागदपत्रे एकत्रित पीडीएफ स्वरूपात पाठवणे आवश्यक आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने राबविण्यात येत असून, अर्ज सादर करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची आवश्यकता नाही. नागरिक आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने अर्ज सादर करू शकतात. जिल्हा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी अर्जदारांना अर्ज भरण्यापासून, शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना भेट देऊन खातरजमा करण्यापर्यंत सर्व बाबतीत सहकार्य करतात. तसेच जनजागृती आणि आपत्कालीन सेवा पुरविण्याचाही कार्यभाग ते बजावतात.

संपर्कासाठी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे खालील अधिकारी उपलब्ध आहेत —
वैद्यकीय अधिकारी 9511876931, वैद्यकीय अधीक्षक 8888531701, जिल्हा समन्वयक 9284352925
तसेच अधिकृत ईमेल आयडी cmrfgadchiroli@gmail.com यावरही संपर्क साधता येतो.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा असहाय आणि संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी आशेचा किरण आहे. शासनाच्या संवेदनशील दृष्टिकोनातून उभ्या राहिलेल्या या योजनेचा लाभ अधिकाधिक गरजूंपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक सामाजिक जबाबदारी आहे.

गजानन जाधव

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.