मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यत पोहचवा – पालकमंत्री अतुल सावे

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र विशेष मोहिमेचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

नांदेड दि. २२ जुलै :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. हे अभियान जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. आज जिल्हा रुग्णालयात त्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोशना आरा तडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, डॉ. एच. साखरे, डॉ. गायकवाड तसेच सर्व नेत्र चिकित्सा अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या मोहिमेदरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून प्रत्यक्ष गृह भेट व रुग्णालयात येणाऱ्या 40 वर्षाच्या वरील नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदूच्या रुग्णांचा शोध घेण्यात येत आहे.  या सर्व रुग्णांची जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  समाजातील एकही व्यक्ती मोतीबिंदू मुळे अंध होणार नाही याची खबरदारी घेवून “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” या संकल्पनेला पूर्ण करण्याचे आवाहनही पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. याबाबत योग्य ती खबरदारी जिल्हा प्रशासन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या अभियानासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये आशा कार्यकर्ती, एमपीडब्लु, समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत मोतीबिंदूचे रुग्ण गाव, वस्ती, वाडी पातळीवरून शोधून, मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सोबतच जन्मतःच मोतीबिंदू असणाऱ्या बालकांचे शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत.  म्हणून त्यासाठी लागणारे नव-नविन तंत्रज्ञान (फॅको मशीन्स हे उच्च दर्जाची उपकरणे (सुक्ष्मदर्शक यंत्रणा ), ए-स्कॅन बायोमीटर मशीन शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मेघना कावली, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नांदेड डॉ. संगीता देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर आपनगिरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रोशना आरा तडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पाटील, डॉ. एच. साखरे, डॉ. गायकवाड तसेच इतर सर्व नेत्र चिकित्सा अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

00000