देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता प्रयत्न गरजेचे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

पुणे, दि. २२ : देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनासाठी राज्यशासनाच्यावतीने देशी गाय संशोधन केंद्राला ७१ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला असून आगामी काळातही याकामी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहा’च्या समारोपप्रंसगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दराडे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, देशी गायी बाबत समाजात प्रेम, आत्मयिता असून ग्रामीण भागात महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे देशी गायीबाबत आज विविध ठिकाणी संशोधन होत आहेत. आगामी काळ हा कृषी क्षेत्राला अनुकूल असून कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती तसेच देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्याचे काम करावे. पुरस्कारामुळे आपल्या जबाबदारीत वाढ होते, त्यामुळे देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करण्यासोबतच त्याचे मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याचे काम करावे, असेही श्री. भरणे म्हणाले.

श्री. बनसोडे म्हणाले,  देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमातून विविध देशी गाईबाबत माहिती मिळाली. त्यामुळे आगामी काळात विविध गोशाळेला भेटी देऊन त्यांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या कामकाजाविषयी माहिती घेण्यात येईल, असेही श्री. बनसोडे म्हणाले.

श्री. मुंदडा म्हणाले, महाराष्ट्र गोसेवा आयोगाला स्थापन होवून दोन वर्ष झाली असून गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोवंश परिपोषणासाठी प्रतिमहिना 1 हजार 500 रुपये आणि प्रत्येक तालुक्यात एका गोशाळेला देशी गोवंश निवाऱ्याकरिता 15 ते 25 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. आज सर्वत्र देशी गोवंश जतन व संवर्धन दिन साजरा करण्यात येत आहे. गोसेवा आयोगाच्यातीने गोवंश संवर्धनाकरिता गोसंवर्धन, गोसंगोपन, गोसंरक्षण, गोमयमुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोआधारित शेती, गोपालक, गोसाक्षरता आणि गोपर्यटन या संकल्पनेवर आधारित  ‘गो-टेन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. देशी गोवंश संगोपन, संवर्धनाकरिता महाराष्ट्र गोसेवा आयोग कटीबद्ध आहे, नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. मुंदडा यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धनाकरिता काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

0000