मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरत आहे रुग्णांसाठी आशेचा किरण !

गत सहा महिन्यात ३७ रुग्णांना ३३ लाख ३६ हजारांची मदत

चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण तसेच उपचारासाठी पुरेसा आर्थिक आधार नसलेल्या कुटुंबाना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमुळे मोठा दिलासा मिळत आहे. गत सहा महिन्यात जिल्ह्यातील 37 रुग्णांना 33 लाख 36 हजार रुपयांची मदत देण्यात आली असून या कुटुंबासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आशेचा नवा किरण ठरला आहे.

चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये 1 मे 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत जिल्ह्यातील 37 रुग्णांना 33 लाख 36 हजाराची मदत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांचे जीव वाचले आहेत. तसेच कॅन्सर व हृदयशस्त्रक्रिया केलेल्या अनेक रुग्णांवर वेळेवर उपचार होऊ शकले.

या आजारांवरील उपचारासाठी मिळते मदत : या निधीतून कॉकलियर इम्प्लांट/अंतस्त कर्ण रोपण शस्त्रक्रिया, हृदय प्रत्यारोपण (Heart Transplant), यकृत प्रत्यारोपण (Liver transplant), मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant), फुप्फुस प्रत्यारोपण (lung transplant), अस्थीमज्जा प्रत्यारोपण ( Bone marrow Transplant), हाताचे प्रत्यारोपण ( Hand re- construction surgery), खुब्याचे प्रत्यारोपण ( Hip replacement), कॅन्सर शस्त्रक्रिया, कॅन्सर किमोथेरपी आणि रेडिओथेरपी, अस्थिबंधन, नवजात शिशुचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण (Knee replacement), दुचारीवरील अपघात, लहान बालकाच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस जळीत रुग्ण, विद्युत अपघात/ विद्युत जळीत रुग्ण अशा गंभीर व जीवघेण्या आजारांवरील उपचारासाठी मदत दिली जाते. याशिवाय, मदत न मिळाल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यासारख्या पर्यायी योजनांची माहितीसुध्दा रुग्णांना देण्यात येते.

योजनेसाठी पात्रता  व निकष : अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. त्याची आर्थिक परिस्थिती दुर्बल असावी. ( रुपये 1.60 लाख प्रती वर्ष पेक्षा कमी असणे आवश्यक आहे). रुग्ण सरकारी/धर्मादाय/मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेत असावा.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे : डॉक्टरांचे आजारावरील प्रमाणपत्र, हॉस्पिटलच्या खर्चाचे अंदाज पत्रक, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रुग्णाचे आधार कार्ड/ लहान बालकाच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशनकार्ड, संबंधित व्याधी विकार/ आजाराच्या संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफ.आय.आर रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णांसाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले अधिवास प्रमाणपत्र आवश्यक. अर्जदारांनी ही कागदपत्रे प्रशासकीय इमारत, पहिला माळा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात थेट जमा करावीत.

अर्ज करण्याची प्रक्रिया : संबंधित रुग्णालयातून प्रस्ताव तयार केला जातो. तो वैद्यकीय अधिकारी जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्रालयात पाठवला जातो. समिती परीक्षण करून निधी मंजूर करते.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा चंद्रपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या माळ्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक भास्कर झळके यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेल्या या कक्षाचा जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कुंभलकर यांनी केले आहे.

00000