पुणे दि. २६:- भारताचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. जो पर्यंत मुलांना भारताचा गौरवशाली इतिहास समजणार नाही तो पर्यंत त्यांच्या मनात जोश निर्माण होणार नाही. आय टी आय मध्ये प्रथमच विजय दिवस साजरा केला जात असून,भारताचा गौरवशाली इतिहास मुलांना समजावा हाच विजय दिनाचा मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
लोणावळा येथील क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोणावळा क्रांतिकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रतिभा चव्हाण, पुणे प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे आदी उपस्थित होते.
श्री.लोढा पुढे म्हणाले, इस्त्राईल लहान देश आहे पण प्रत्येक नागरिकामध्ये देशप्रेमाची भावना असल्यामुळे देश लहान असला तरी तो लढतो व जिंकतो आहे. देशासाठी लढणाऱ्यांच्या इतिहास बाबतची माहिती जागोजागी प्रदर्शित केली पाहिजे. लोणावळा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १४ विविध प्रकारचे कोर्सेस सुरु असून,अजून छोटे कोर्सेस सुरू करण्याचा विचार आहे. विद्यार्थ्यांना बोलते करा त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही तसेच कुशल प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. लोणावळा येथे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने लोक येत असतात, त्यामुळे मुलांनी हॉस्पिटॅलिटी व्यवसायात पुढे येणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
माजी सैनिक महेश थत्ते म्हणाले, कारगिलच्या लढाईने देशाने नेहमी युद्धासाठी सज्ज राहावे असा संदेश दिला. या युद्धामुळे भारताची प्रगल्भता वाढली आहे आणि भारताला एक चांगला युद्धाचा अनुभव मिळाला आहे . यावेळी त्यांनी कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
लेखिका व साहित्यिक मंजुश्री मंगल प्रभात लोढा यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटनिदेशक श्री पासलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी श्रेया चामरे यांनी केले. याप्रसंगी लोणावळा परिसरातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला क्रांतीकारक लहुजी साळवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक,कर्मचारी, विद्यार्थी व माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000