कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून नागरिकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात गतीने पुढे नेणार असून, नागरिकांना मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. कोल्हापूर येथील सेवा रुग्णालयात मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आयोजित मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जैन आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह आरोग्य विभागाचे इतर अधिकारी व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, या ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिरात 1 हजार नागरिकांची तपासणी, आवश्यक साहित्यांचे वाटप आणि गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. सेवा रुग्णालयात येणाऱ्या काळात एम.आर.आय., सी.टी. स्कॅन मशीन, कॅथ लॅब आणि आय.पी.एच.एल. लॅब या अत्याधुनिक प्रस्तावित सुविधांमुळे नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मोफत चष्मे आणि श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले.
राज्यात शासनाने सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू केले. ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्याच परिसरात आधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून भविष्यात आरोग्यसेवेसाठी रुग्णांना खर्चच करावा लागणार नाही, यासाठी राज्यभर मोफत आरोग्य सुविधा उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.
खासदार डॉ. शिंदे पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, महिलांसाठी लाडकी बहीण योजना, त्यांची आरोग्य तपासणी, शासन आपल्या दारी अशा अनेक योजनांद्वारे उल्लेखनीय काम केले आहे. आतापर्यंत राज्यातील एक कोटी महिलांची कर्करोग तपासणी पूर्ण झाली आहे.
उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी आभार मानले. या शिबिरात आणि प्रस्तावित कामांच्या शुभारंभ सोहळ्यात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
000000