पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पत्रकारिता करावी – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली माध्यम प्रतिनिधींची कार्यशाळा उत्साहात संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 27: पत्रकारांनी कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)ने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारिता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात पत्रकारांसाठी एकदिवशीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी राम कैलाश मीना, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, प्रा. दीपक रंगारी, तुकाराम झाडे, नंदकिशोर तोष्णीवाल उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील मुद्रित माध्यमे, ईलेक्ट्रॉनिक, समाजमाध्यमांत काम करणा-या पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार माध्यमात काम करताना दैनंदिन कमकाजात जास्तीत जास्त वापर करता येईल, याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात चँट जीपीटीच्या माध्यमातून आपल्याला हव्या त्या विषयाची माहिती टंकलिखित करताक्षणी काही सेकंदात उपलब्ध होते, आणखी काही शिक्षण विभागातील मुलांसाठी अभ्यासक्रमातील चाचणी परीक्षा घेण्यासाठी प्रश्न पत्रिकेचा मजकूर टाकल्यास प्रश्न आणि त्याचे उत्तरही सहज मिळते, त्यामुळे या चँट जीपीटीचा वापर करून सविस्तर माहिती मिळविता येते. मात्र आपल्याला काय हवे याची माहिती असणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हा सूचना अधिकारी राम मीना यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता याबाबत मार्गदर्शन करताना सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

प्रा. दीपक रंगारी यांनी वृत्तसंकलन-संपादनात शुद्धलेखनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना मराठी प्रमाणभाषेच्या शुद्धलेखनाचे नियम, शब्दाचा अर्थ, भाषेतील व्याकरणाचा वापर याबरोबरच मराठी भाषा समृद्ध करण्यात विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. वाक्यामध्ये येणारी क्रियापदे, शब्दयोगी अव्यय, ऱ्हस्व, दीर्घ, ईकारांत याबरोबरच एकाक्षरी क्रियापद, शब्दयोगी अव्यय, तत्सम आणि तद्भव शब्दांविषयीचे स्पष्टीकरण उदाहरणासह समजावून सांगितले. शब्दकोश आणि लेखनकोश याचा वापर करून पत्रकाराचे निर्दोष लिखाण कसे असावे, याविषयी मार्गदर्शन केले.

जिल्हा माहिती अधिकारी  प्रभाकर बारहाते यांनी पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अधिस्वीकृती पत्रिका, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार आदी विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, संतोष भिसे यांनी पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन चांगल्या प्रकारची माहिती दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रद्मुम्न गिरीकर यांनी केले, तर आभार चंद्रकांत कारभारी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत कारभारी, श्रीकांत देशमुख, गंगा देशमुख आदींनी परिश्रम घेतले.