उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची माहितीपुस्तिका प्रकाशित

मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातील सर्वसमावेशक माहिती देणारी “भारताचे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक – २०२५” ही पुस्तिका प्रकाशित केली आहे.

संविधानातील कलम ३२४ अंतर्गत आयोगाला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. कलम ६८(२) नुसार, मृत्यू, राजीनामा, पदच्युती किंवा इतर कोणत्याही कारणामुळे उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास शक्य तितक्या लवकर निवडणूक घेण्यात येते. नव्याने निवडून आलेल्या व्यक्तीला, कलम ६७ नुसार, पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून पाच वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळतो.

ही निवडणूक The Presidential and Vice-Presidential Elections Act, 1952 व The Presidential and Vice-Presidential Elections Rules, 1974 यांच्या अधीन राहून घेतली जाते. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लोकसभा किंवा राज्य विधानसभा निवडणुकीपेक्षा वेगळी असते. यात मतदारसंघ, उमेदवारांची पात्रता, मतदान पद्धती, मतमोजणी पद्धत आणि कायदेशीर तरतुदी या बाबतीत मोठा फरक असतो.

निवडणुकीबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आयोगाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत संविधानिक तरतुदी, निवडणूक मंडळाची रचना, उमेदवारांची पात्रता, महत्त्वाच्या निवडणूक प्रक्रियाविषयक तरतुदी, निवडणूक कार्यक्रम निश्चिती, मुख्य व सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक, मतदान स्थळ निश्चिती, मतदान प्रणाली, मतमोजणी पद्धत आणि निवडणूक वादांवरील तरतुदीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

याशिवाय या पुस्तिकेत १९५२ ते २०२२ या कालावधीत झालेल्या एकूण १६ उपराष्ट्रपती निवडणुकांचा थोडक्यात इतिहासही दर्शविला आहे. ही पुस्तिका निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/