चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.
नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात राज्यस्तरीय सन्मान समारंभ पार पडला. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने संपूर्णता अभियानातील सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे यापैकी तीन इंडिकेटर्स आरोग्य विभागाशी संबंधित असून ते १०० टक्के समृद्ध करण्यात आले होते.
समारंभप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजकुमार उपस्थित होते.
यावेळी जीवती तालुक्यातील यशस्वी सहभागाचे प्रतिनिधीत्व करत गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, आकांक्षित तालुका समन्वयक गणेश चिंटकुंटलवार व ‘उमेद’चे राजेजी दुधे यांनीही सन्मान स्वीकारला.
या यशामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय समन्वयक यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. विशेषतः जीवती तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिद्द, चिकाटी व समर्पण भावनेने केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.
००००००