बीड, दिनांक ७ (जिमाका) : बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. परंतु ऊसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी अशा योजना आहेत. ऊसतोड कामगारांचे जीवन सुखकर होऊन त्यांच्या जीवनात स्थिरता, सुरक्षितता निर्माण करण्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापन करण्यात आलेली आहे. या महामंडळाच्या माध्यमातूनही विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ सर्व कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
जिल्हा परिषद व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे जिल्ह्यातील ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन व मिशन साथी उपक्रमाचा शुभारंभ श्री. पवार यांच्या हस्ते झाला.
यावेळी सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, धनंजय मुंडे, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आदींसह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पवार म्हणाले, कष्टकरी ऊसतोड कामगार स्वाभिमानी आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासन करत आहे. बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अनेक प्रश्न, समस्या आहेत. त्या दूर करण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या प्रत्येक पाल्याला उत्तम शिक्षण मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. ऊसतोड कामगारांसाठी अनेक योजना आहेत. त्यांचा लाभ सर्वांनी घ्यावा, यामध्ये सदस्यांना ओळखपत्र देण्यात येते. केवळ २० रूपयांमध्ये अर्ज करता येतो. संत भगवान बाबा वसतिगृह योजनेंतर्गत २२ वसतिगृह राज्यात मंजूर करण्यात आली आहेत, त्यापैकी १६ वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहांना आर्थिक मदत देण्यासही शासन सकारात्मक आहे. ऊसतोड कामगारांची पुढची पिढी ऊसतोड कामगार राहणार नाही, याची काळजी घेऊन त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.
आजच्या नवतंत्रज्ञानाच्या काळात साधनेही आधुनिक स्वरूपात बाजारात उपलब्ध झालेली आहेत. यांत्रिकीकरण वाढत आहे, त्यामुळे सर्वांना काळानुरूप बदलावे लागेल, असेही ते म्हणाले.
शासनाने सीट्रीपलआयटीच्या माध्यमातून याठिकाणी कुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे, यासाठी मदत होणार आहे. या केंद्रातून आगामी काही वर्षात दरवर्षी ७००० कुशल विद्यार्थी निर्माण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील कौशल्यवर्धक तंत्रशिक्षण व व्यावसायाभिमूख रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टी सीट्रीपलआयटी प्रकल्प बीड जिल्ह्यात निर्माण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी पुढकार घ्यावा शासन निधी देईल, तो सत्कारणी लावावा, असेही ते म्हणाले.
बीड-अहिल्यानगर-मुंबई रेल्वे लवकरच सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासह बीड शहराजवळ किफायतशीर स्वरूपात विमानतळ असावे, यासाठीही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात आरोग्य साथी महिलांना फर्स्ट एड किटचे (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांसाठी उपयुक्त माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘बाल विवाह प्रतिबंधक’ प्रतिज्ञेने समाजातील सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धारही सर्वांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमात ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल) चॅटबॉट सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. मेळाव्यास उपस्थित सर्व महिलांना श्री.पवार यांनी रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या.
00000