- एकाच दिवशी जिल्ह्यात विविध ठिकाणी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड
- आकांक्षित तालुका कार्यक्रमात वडवणी तालुक्याची लक्षणीय कामगिरी
बीड, दिनांक ०७ (जिमाका) : हवामान बदल, वाढते प्रदूषण, पाण्याची टंचाई यामुळे वृक्ष लागवड ही काळाची गरज झाली आहे. बीड जिल्ह्याने एकाच दिवशी ३० लाखांहून अधिक रोपांची लागवड करून विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हरित बीड अभियानात सहभागींचे कौतुक केले. या रोपांचे संवर्धन, संगोपनाची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. जिल्हा प्रशासनाने वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन हरित बीड अभियानाचा संकल्प पूर्णत्वास न्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत हरित बीड अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री पवार यांच्याहस्ते रोपाची लागवड करून आज झाला. हा कार्यक्रम खंडेश्वरी मंदिर परिसरात पार पडला.
या अभियानांतर्गत आज जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाच दिवशी ३० लाख स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली. त्यानुसार इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी अशोक अदक यांनी पालकमंत्री यांना प्रमाणपत्र, पदक सुपुर्द करण्यात आले. तर पालकमंत्री पवार यांच्याहस्ते हे प्रमाणपत्र व पदक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, सर्वश्री आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, नमिता मुंदडा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उद्योग विभागाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.पवार म्हणाले, हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत यापुढे दरवर्षी २५ कोटी वृक्षांची लागवड करणार आहे. आगामी चार वर्षात १०० कोटी रोपांची लागवड करण्याचे ध्येय शासनाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ यामध्येही शासनाची चांगली कामगिरी आहे. वन आच्छादन ३३ टक्के असण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय, राज्य महामार्गाच्या दुतर्फा बाजूंनी स्थानिक प्रजाती असलेली रोपे लावण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उद्योग मंत्री श्री.सामंत यांनीही बीड जिल्ह्याच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे कौतुक केले. वृक्ष संवर्धन आणि संगोपन ही आपली सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने ती पार पाडावी, असे आवाहन केले. शिवाय बीड येथे उभारण्यात येत असलेल्या सीट्रीपलआयटीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नक्कीच गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. वृक्ष लागवड अभियानातून बीड जिल्हा विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी केले. यामध्ये त्यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या हरित बीड अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. याच कार्यक्रमामध्ये पालकमंत्री श्री.पवार यांच्याहस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र चिंचाणे, वडवणीचे गट विकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आणि सुदर्शन राख यांना आंकांक्षित तालुका अभियानांतर्गत वडवणी तालुक्याने देशपातळीवर ६१ वा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पालकमंत्री पवार यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
0000