नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य – अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान

मुंबई, दि. १३ :- राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे. ग्राहकांना निर्भेळ शुद्ध, स्वच्छ व उत्तम प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी केले.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने आयोजित “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आला. या अभियानांतर्गत अन्न व्यवसायिकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सणासुदीचे विशेष तपासणी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

श्री. धीरज कुमार म्हणाले की, सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना निर्भेळ, सकस व शुद्ध अन्न उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता अन्न व्यावसायिकांनी घ्यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून कायद्याची अंमलबजावणी सोबत जनजागृती, प्रशिक्षण करण्यासाठी ही आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर तसेच इतर शहरातही अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री व राज्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विभागाने पुढे येऊन काम करावे व अंमलबजावणीमध्ये आपला विभाग अग्रस्थानी राहिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात अन्न तपासणी लॅबची संख्या वाढवत आहोत. विभागासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्राहकांना निर्भेळ शुद्ध ,स्वच्छ व चांगल्या प्रतीचे अन्न उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व्यवसायिकांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे ते आत्मसात करून कृतीमध्ये आणावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दि. ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” या अभियानातून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत अंमलबजावणी, जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी या तीन मुख्य घटकांवर भर दिला जाणार आहे. अन्न व्यवसायिकांनी कायद्याच्या सर्व तरतुदींचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

गणेशोत्सव, ईद, नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या काळात मिठाई, मोदक, फराळ, प्रसाद या सारख्या खाद्यपदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या वाढत्या मागणीत काही अन्न व्यावसायिकांकडून अयोग्य किंवा भेसळयुक्त अन्न तयार व विक्री होण्याचा धोका असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने हे अभियान हाती घेण्यात आले आहे. अभियानाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळे, मिठाई उत्पादक, मोदक व फराळ तयार करणारे महिला बचत गट यांच्यासाठी अन्न स्वच्छतेवरील कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर म्हणाले की, सणासुदीच्या कालावधीमध्ये बाजारात मागणीपेक्षा पुरवठा कमी होतो तेव्हा भेसळ सारखे प्रकार आढळून येतात. यामध्ये शासन, अन्न व्यवसायिक व ग्राहक या तिघांची महत्त्वाची भूमिका असते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अन्न व्यवसायिकांनी योग्य प्रकारे पालन आपल्या माध्यमातून होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सणासुदीच्या कालावधीमध्ये अशा भेसळ प्रकार होऊन गालबोट न लागता आपले सण उत्साहात साजरे करण्यासाठी अन्न व्यवसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली.

यावेळी खाद्यान्न विक्रेत्याच्या (फेरीवाला) प्रतिकृतीचे सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. खालसा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी भेसळयुक्त अन्न खाल्ल्यामुळे होणाऱ्या परिणामावर जनजागृतीवर आधारीत नाटक सादर केले. ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान’ शुभारंभ यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. अन्न व्यावसायिकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त राजेश नार्वेकर, सहसचिव धनावडे, सह आयुक्त मुख्यालय मंगेश माने तसेच अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय सह आयुक्त, सहायक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. नेस्ले कंपनीचे संजय भंडारी, नास्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद सिंग तसेच खाद्यान्न विक्रेते व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर कळवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त मंगेश माने यांनी आभार मानले.

००००