मुंबई, दि. १३ :- चिंचवड येथील एक्साईड इंडस्ट्रीच्या काढून टाकलेल्या कामगारांना कामावर घेण्याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाने दहा दिवसात निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज दिले.
विधानमंडळ येथे विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक्साईड इंडस्ट्रीज व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीस पिंपरी चिचंवड सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे, पुणे अतिरिक्त कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, उपायुक्त निखिल वाळके, सहायक कामगार आयुक्त गजानन शिंदे, कक्ष अधिकारी संदीप पाटील, एक्साईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापन प्रतिनिधी संतोष चव्हाण आणि कामगार उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री. बनसोडे म्हणाले की, एक्साईड कंपनीने काढून टाकलेल्या १० कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे असे सुचित करताना याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करावी. एक्साईड कंपनी व्यवस्थापनाने विविध कारणे देऊन काही कामगारांना दोन ते तीन वर्षापासून कामावरून काढून टाकले होते तसेच त्यांना त्याबाबत कोणतीही भरपाई देण्यात आली नव्हती. यामुळे संबंधित कामगार आंदोलन व उपोषण करून त्यांच्या प्रकरणात निर्णय घेण्याबाबत मागणी करत होते. दोन-तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष श्री.बनसोडे यांनी कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याशी समन्वय राखत बैठकीद्वारे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला.
कंपनी व्यवस्थापनाने या कामगारांना दुसऱ्या ठिकाणी बदली करुन रुजू होण्याचे सुचविले आहे. परंतू, ते कामगार सेवानिवृत्तीच्या जवळ असल्याने वयोमानामुळे त्यांना इतर ठिकाणी काम करणे शक्य होणार नाही. निर्णय घेताना मागील 2 वर्षापासून त्यांना कामावरुन काढले असल्याने त्यांच्या अडचणी व आर्थिक नुकसानीबाबत देखील विचार केला जावा असे उपाध्यक्ष श्री बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी बैठकीमध्ये कामगार विभागाचे अधिकारी, कंपनीचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांनी माहिती दिली.
0000
किरण वाघ/विसंअ/