शांतता समितीची बैठक संपन्न
नंदुरबार, दिनांक 16 : आगामी गणेशोत्सव आणि ईद हे सण शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारीची रूपरेषा आखली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भरलेल्या शांतता समितीच्या बैठकीत पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सुरक्षितता आणि पायाभूत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश दिले.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्वतंत्र 7 कोटी 50 लाखांची आर्थिक तरतूद केली आहे. याशिवाय, नागरिकांच्या जीवितास धोका ठरणाऱ्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. “विसर्जन मार्ग सुरक्षित, प्रकाशमय आणि अडथळामुक्त ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे कोकाटे म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांनी अंडरग्राउंड वीज तारा टाकण्यासाठी अंदाजपत्रक (Estimate) तयार करण्यासही सांगितले. पुढील काळात कार्यवाही जलद व्हावी यासाठी, गणेशोत्सवापूर्वी किमान दोन महिने आधी शांतता समितीची बैठक घेण्याची पद्धत राबवावी, अशीही सूचना त्यांनी केली. यामुळे समस्या ओळखणे, नियोजन आणि अंमलबजावणी यांना पर्याप्त वेळ मिळेल,असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदर, अंजली शर्मा, निवासी श्रीमती कल्पना ठुबे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे, डॉ. अभिजीत मोरे, शांतता समितीचे सदस्य व संबंधित विभागाचे प्रमुख, गणेश मंडळांचे पदाधिकारी य उपस्थित होते. शहरातील प्रमुख मुद्द्यांवर सदस्यांनी सूचना मांडल्या असून मांडलेल्या प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
“गणेशोत्सव आणि ईद या दोन्ही सणांवर कोणतेही गालबोट लागू नये, हीच अपेक्षा. प्रशासन सर्वतोपरी मदत करेल; मात्र नागरिकांनीही सहकार्याची भूमिका ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे कोकाटे यांनी नमूद केले.
पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकत्र येत असून सर्व समाजबांधवांनी हे सण शांततेत पार पाडावेत. शांतता समितीच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात येईल. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता मंडळाच्या अध्यक्षांनी व पोलिस प्रशासनाने घ्यावी आणि नागरिकांनीही सहकार्य करावे. गणेश मंडळांनी सामान्य नागरिकांनी त्रास होणार नाही असेच देखावे सादर करावेत. अमली पदार्थ विरोधी तसेच समाजप्रबोधनपर देखावे सादर करण्यास प्राधान्य द्यावे, तर राजकीय देखावे सादर करू नयेत. राज्य शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील विद्युत प्रवाहाची दुरुस्ती करावी तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि गणेश मंडळाचे अध्यक्ष यांनी समन्वयातून गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, जिल्ह्यातील शहादा, नंदुरबार व गुजरातमधील काही गणेश मंडळांची मूर्ती विसर्जनासाठी सारंगखेडा व प्रकाशा नदीपात्रात आणली जाते. त्यामुळे तेथील दोन्ही पुलांच्या बाजूंची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करावी, असेही निर्देश पालकमंत्री कोकाटे यांनी यावेळी दिले.
000