सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : मिरज तालुक्यात 33/11 के.व्ही. कानडवाडी उपकेंद्र येथील 10 एम.व्ही.ए. पॉवर ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार डॉ. सुरेश खाडे, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कं. लि. च्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर, एमएसईबी कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, सांगली मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, सांगली ग्रामीणचे कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम, सांगली शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे, शेखर इनामदार आदि उपस्थित होते.
या ठिकाणी यापूर्वी उपलब्ध क्षमतेपेक्षा अधिक भार आल्यामुळे वारंवार कमी दाबाचा पुरवठा, नवीन ग्राहकांना जोडणी देताना अडचण, कृषी वसाहतींना अपुरा पुरवठा, औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रात नियमित तक्रारी व उत्पादनात अडथळे या समस्या उद्भवत होत्या. यामध्ये संचालिका नीता केळकर यांनी वैयक्तिक लक्ष घालून त्वरित मुख्य कार्यालय मुंबई येथून मंजुरी घेऊन 200.04 लक्ष इतका निधी त्वरित उपलब्ध करून दिला. यामुळे कानडवाडी उपकेंद्रामधील एका पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता 5 एम.व्ही.ए. वरून 10 एम.व्ही.ए. करण्यात आली.
या कामामुळे कानडवाडी, सावळी व तानंग गावांसाठी नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक भार, वाढीव वीजभार देणे शक्य, पूर्वी कमी दाबाने मिळणारा पुरवठा आता योग्य दाबाने व सुरळीत उपलब्ध हे लाभ झाले. उपकेंद्रातून 11 के.व्ही.च्या दोन उच्चदाब वाहिन्या नव्याने कार्यान्वित होऊन अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा, उद्योग, व्यवसाय व ग्रामविकासाला नवे बळ मिळाले.
या योजनेसाठी एकूण 200.04 लाख रूपये एन.एस.सी. योजनेतून खर्च झाले. या योजनेचे लाभार्थी ग्राहक 2679 घरगुती ग्राहक, 341 औद्योगिक ग्राहक, 271 व्यावसायिक ग्राहक व 709 कृषी ग्राहक आहेत. यामुळे भविष्यात औद्योगिक गुंतवणुकीत वाढ, रोजगारनिर्मितीला चालना व ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.
या कामामुळे वीज ग्राहकांनी व औद्योगिक संघटनांनी त्यांच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींचे निवारण झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. आभार अधीक्षक अभियंता बोकील यांनी मानले. या कार्यक्रमास कानडवाडी व सावळी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थ तसेच सावळी, कानडवाडी व तानंग हद्दीमधील औद्योगिक ग्राहक संघटना उपस्थित होत्या.
000