सातारा दि.२१ – पावसाचे प्रमाण व धरणातून विसर्ग कमी झाल्यानंतर अतिवृष्टीमुळे बाधीत, शेती, पशुधन, घरे, विद्युत यंत्रणा, रस्ते, पुल व अन्य सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. अतिवृष्टीबाधित एकही बाधित वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी तांबवे पूल व कराडचे प्रितीसंगम येथील पूर परिस्थितीची पाहणी करून शासकीय विश्रामगृह कराड येथे तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे,पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हाटकर, गट विकास अधिकारी प्रताप पाटील यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत लवकरच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, धरणातील पाण्याचा विसर्ग व पाऊस कमी झाला असला तरी ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व लाईनमन यांनी क्षेत्रीय स्तरावरच 24×7 तास उपलब्ध राहावे. अतिवृष्टी व पुरामुळे ग्रामीण भागातील रस्ते, साकव पुलांचे नुकसान झाले आहे. याचे संबंधित विभागाने तातडीने पंचनामे करावेत. बऱ्याच ठिकाणी विद्युत पोल व विद्युत तारांचेही नुकसान झाले असून विद्युत वितरण कंपनीने त्याचेही पंचनामे करावे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या.
सध्या पाऊस ओसरला असला तरी पावसाळा सुरु आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी अलर्ट रहावे. ओढे-नाले ओलांढून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्यास विशेष खबरदारी घ्यावी. पाणी वाढल्यामुळे शाळेला सुट्टी द्यावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये यासाठी त्यांचा अभ्यासक्रम भरुन काढावा. दरड कोसळून कुठेही वाहतूक व्यवस्था बंद पडणार नाही याची दक्षता घ्या, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी धारकांचे दूरध्वनी क्रमांक संबंधित गावच्या सरपंचाकडे द्यावे. संबंधित सरपंच जेसीबी धारकांना फोन करून तातडीने वाहतूक मार्ग सुरळीत करतील.
तांबवे येथे पूल अतिवृष्टीमुळे खराब झाला आहे. या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, कोयना धरणातून विसर्ग वाढल्यानंतर कराड शहरातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण होती व काही घरे पाण्याखाली जातात. त्या घरांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी नगरपालिकेने जागा शोधावी त्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून दिली जातील. तसेच कृष्णा व कोयना नदीमधून गढूळ पाणी येते आहे हे पाणी स्वच्छ करूनच नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावे. गढूळ पाण्याचा पुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पूर परिस्थिती ओसरल्यानंतर साथ रोग पसरणार नाही त्याची दक्षता घ्या, असे निर्देश पालकमंत्री श्री .देसाई यांनी दिले.
पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील पूर परिस्थतीची पहाणी करुन तेथे करण्यात आलेल्या उपायोजनांची प्रांताधिकारी आशिष बारकुल व मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडून माहिती घेतली.
0000
Home जिल्हा वार्ता पाऊस ओसरताच पंचनामे तात्काळ पूर्ण करा अतिवृष्टीबाधित मदतीपासून वंचित राहणार नाही याची...