महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

अमरावती, (दि. २१ ऑगस्ट) : विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी आज महानगरपालिकेच्या रहाटगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा-सुविधांचा सखोल आढावा घेतला. नागरिकांना आरोग्य विषयक सर्व सोयी-सुविधा तत्परतेने मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान डॉ. सिंघल यांनी केंद्रात दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णांची नोंदणी, तपासणी आणि मोफत औषध वाटप यांसारख्या सुविधांचा नागरिक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी भविष्यात या केंद्रांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

विभागीय आयुक्त डॉ. सिंघल म्हणाल्या की, शहरातील नागरिकांना मोफत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. रुग्णांची नोंदणी आणि आरोग्य अहवाल संगणकीकृत पद्धतीने ठेवावे, जेणेकरून आकडेवारीचे विश्लेषण आणि नियोजन सोपे होईल. आरोग्यविषयक जागृतीसाठी नियमित मोहीम आणि कार्यशाळांचे आयोजन करावे. आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवण्यास प्राधान्य द्यावे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावित, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेली आरोग्य वर्धिनी केंद्रे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. रुग्ण नोंदणी, तपासणी आणि आवश्यक औषधे या ठिकाणी मोफत दिली जातात.  या आरोग्य वर्धिनी केंद्रांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केंद्रातील सेवा अधिक प्रभावी बनवण्यासाठी सूचना दिल्यात. त्या म्हणाल्या की, औषधांचा तुटवडा जाणवू नये यासाठी औषधसाठा सातत्याने अद्ययावत ठेवावे. गरजेनुसार नवीन तपासणी उपकरणे व सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे. नागरिकांकडून अभिप्राय घेऊन त्यानुसार सेवांमध्ये सुधारणा करावे. वैद्यकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देणारी व्यवस्था कार्यान्वित ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. संदीप पाटबागे, डॉ. तरोडेकर आणि स्टाफ नर्स सुचिता चोपडे आदी उपस्थित होते.

00000