मुंबई, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात “अभिजात मराठी – माझ्या अपेक्षा” या विषयावर होणाऱ्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या अनुषंगाने मराठी भाषा विभागाचे सह सचिव डॉ. नामदेव भोसले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘दिलखुलास’या कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 25, मंगळवार दि. 26 आणि बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर ऐकता येईल. याशिवाय ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत फेसबुक, एक्स (Twitter) आणि युट्यूब या समाजमाध्यमांवरही ही मुलाखत पाहता येणार आहे. ही मुलाखत कक्ष अधिकारी वासंती काळे यांनी घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
केंद्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. ही घटना सर्व मराठी बांधवांसाठी अभिमानाची असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या दिनानिमित्ताने ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या आठवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी भाषा दूत ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी “अभिजात मराठी – माझ्या अपेक्षा” हा विषय दिला गेला आहे. यामाध्यमातून जगभरातील मराठी भाषिक तरुणांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उपक्रमामागील भूमिका आणि स्पर्धेबाबतची सविस्तर माहिती मराठी भाषा विभागाचे सह सचिव डॉ. भोसले यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
000
जयश्री कोल्हे/स.सं