पुणे, दि. २२: ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. लोकांच्या सहभागातून शासनाच्या योजना कशा यशस्वी होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे ते केवळ प्रशासक नव्हते तर एक विकासयात्री होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी डॉ. कलशेट्टी यांचा गौरव केला.
यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी लिखित ‘मी विकासयात्री’ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, अखिल भारतीय मराठी संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. कलशेट्टी हे प्रशासनात मनापासून, जीवन ओतून काम करणारे हळव्या मनाचे व्यक्ती आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, डॉ. कलशेट्टी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात ग्रामविकास, ग्रामस्वच्छता यासह लोकाभिमुख अशा योजना चांगल्या प्रकारे राबविण्याचे काम केले आहे. ते गावोगावी फिरले, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकाभिमुख काम करत असताना तसेच योजना राबवत असताना प्रशासनात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मोठी गरज असते. डॉ. कलशेट्टी यांनी हे दाखवून दिले असून त्यांनी स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, ग्रामपंचायती, समाजातील प्रत्येक घटकाला स्वच्छतेच्या कामात त्यांनी सहभागी करून घेतले.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी डॉ. कलशेट्टी यांनी संत गाडगेबाब ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान आदी उपक्रमांत केलेल्या कामाच्या आठवणी सांगून चांगल्या कामाच्या आठवणी समाज विसरत नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विकासाचे वर्णन ‘मी विकासयात्री’ या पुस्तकात करण्यात आले आहे. डॉ. कलशेट्टी यांनी कोविड परिस्थितीत कोविड जनजागृतीचे कामही चांगल्या प्रकारे केले. त्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रमुखपदावर असताना त्यांनी राज्यस्तरीय पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, राज्य भूजल माहिती केंद्र सुरू करण्याचे काम केले.
डॉ. करीर म्हणाले, आपल्या प्रशासन सेवेत काय काम केले यापेक्षा ते का केले याचा डॉ. कलशेट्टी यांनी विचार केला. काम कशासाठी करायचे हा महत्वाचा मुद्दा त्यांच्या कामात दिसून येतो. कोणतीही योजना अधिक यशस्वीपणे राबवावी यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. केवळ शासनाची योजना म्हणून किंवा दाखविण्यासाठी योजना राबविल्यास त्याला लोकमान्यता मिळू शकणार नाही. विकास हा केवळ सरकारी योजनांपुरता नसून तो लोकांच्या सहभागातूनच यशस्वी होतो. हे डॉ. कलशेट्टी यांनी दाखवून दिले. त्यांचे पुस्तक ग्रामीण विकासच्या अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
पोपटराव पवार म्हणाले, 1993 पासून डॉ. कलशेट्टी यांच्यासोबत काम करत आहे. प्रशासनातील भारावून काम करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रशासनातील एखादा अधिकारी जेव्हा झोकून देऊन काम करतो आणि ग्रामीण विकासाचे चित्र बदलण्यासाठी एक नवे आदर्श उभा करतो हे डॉ. कलशेट्टी यांनी दाखवून दिले.
शेखर गायकवाड म्हणाले, डॉ. कलशेट्टी हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत येऊन खूप समर्पित भावनेने काम करणारे दुर्मिळ अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील आठवणी पुस्तकात समर्पकपणे नमूद केल्या आहेत.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ज्यांना प्रशासनात यायचे आहे आणि ग्रामीण विकास विभागात येऊ इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. बदल केंद्रित, लक्ष्य निर्धारित, नाविन्यपूर्णता, विकेंद्रीकरण, नियोजन, कल्पकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसहभागावर आधारित प्रशासन ही विकास प्रशासनाची सात सूत्रे असतात. ही सात सूत्रे डॉ. कलशेट्टींच्या कामातून दिसून येतात. जीवनात कोणतेही काम करताना जीवनध्येय ठरवून केले पाहिजे. त्यांनी स्वच्छतेचे जीवनध्येय ठेऊन उत्कृष्ट काम केले आहे.
डॉ. कलशेट्टी म्हणाले, शासनात काम करत असताना ग्रामविकास विभागातील घटकांना, गावपातळीवरील प्रशासनाला मार्गदर्शन होईल या दृष्टीने पुस्तक लिहिता येईल का यादृष्टीने लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यातून हे पुस्तक आकारास आले. ग्रामस्वच्छता, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, निर्मल गाव अभियानात चांगले काम करण्याची संधी मिळाल्याने महाराष्ट्राचा सन्मान झाला. लोकसहभाग घेतल्याने कामांची यशस्वी अंमलबजावणी करता आली, असे सांगून डॉ. कलशेट्टी यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनातील तसेच शासकीय काम करत असतानाच्या आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाला युनिक अकॅडमीचे संचालक मल्हार पाटील, तुकाराम जाधव, मुक्ता कुलकर्णी, कार्यकारी संचालक विवेक घोटाळे, श्री स्वामी समर्थ मंडळ वळसंगचे (ता. दक्षिण सोलापूर) अध्यक्ष जन्मेजय महाराज भोसले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कला, संस्कृती, साहित्य आदी विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
0000