‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेश मूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

खासदार हेमंत पाटील यांची एम्पोरियमला सदिच्छा भेट

नवी दिल्ली, दि.११ : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्ली स्थित ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमुर्तीचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात होणार आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र एम्पोरियमला सदिच्छा भेट दिली.

महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेश मुर्तींचे प्रदर्शन मांडण्यात आले असून या दालनाला खासदार हेमंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी संध्या पवार यांनी श्री. पाटील यांचे श्रीफळ व शेला देऊन स्वागत केले. निवासी व्यवस्थापक अमरज्योत कौर अरोरा यावेळी उपस्थित होत्या. श्री. पाटील यांनी महामंडळातर्फे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या गणपती प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये महामंडळातर्फे होणाऱ्या कामांची माहिती जाणू घेतली. महाराष्ट्रातील मुर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमुर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या २८ वर्षांपासून गणेशमुर्ती विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात ३९ गणेश मंडळांत गणेशोत्सव साजरा होतो. त्यासोबतच अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला आहे. अनेक मान्यवरांनी गणेशमूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. गणेशमूर्तींची विक्री २२ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील २२ वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील  ‘मऱ्हाठी’एम्पोरियमध्ये येतात. यावर्षी कोरोना प्रादूर्भाव असुनही मुर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक असणाऱ्या यंदा एकूण १०० शाडूच्या मुर्ती आहेत. ६ इंच ते २ फुटापर्यंतच्या गणरायाच्या मुर्ती येथे उपलब्ध आहेत. ७०० रूपयांपासून ते २५ हजार रूपयांपर्यंत गणेशमुर्तींची किंमत आहे.

महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गावरील ‘मऱ्हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात दिनांक २२ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता ०११-२३३६३३६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येवू शकतो.