मुंबई, दि. 13 :- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील झंझावाती नेतृत्व, महान साहित्यिक, प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून महाराष्ट्राची निर्मिती व जडणघडणीतील त्यांचं योगदान राज्यातील जनता कधीही विसरणार नाही, अशा शब्दात त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आचार्य अत्रे यांना अभिवादन करताना म्हणाले की, आचार्य अत्रे म्हणजे अद्वितीय प्रतिभेचं व्यक्तिमत्व होतं. ते जनमानसावर प्रभाव असलेले नेते होते. ते थोर विचारवंत होते. महान साहित्यिक होते. फर्डे वक्ते होते. निर्भीड संपादक होते. वैचारिक वादविवादातून समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी ‘रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र’ असं त्यांचं केलेलं वर्णन म्हणूनच सार्थ ठरतं, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आचार्य अत्रे यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या साहित्यकृती हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्याबद्दल तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील योगदानाबद्दल महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.