सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विकासाचे चक्र सुरु – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

0
15

रयतेच्या भल्यासाठी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने महाराष्ट्र घडलेला आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून या महाराष्ट्राची जडणघडण झाली. या राज्याचे पहिले मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राची ही घडी अधिक मजबूत केली. पुढे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या सारख्याच्या नेतृत्वात या राज्याने प्रगतीचे नवनवी यशोशिखरे निर्माण केली. तीच विकासाची परंपरा कायम ठेवून आमचे सरकार या राज्यात काम करत आहे. गेल्या ८ महिन्यात जिल्ह्याच्या विकासासाठी या सरकारनी जी कामे केली त्यातून सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. आता या जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. आम्ही जे जे म्हणून शक्य आहे ते ते या जिल्ह्याच्या विकाससाठी करत आहोत. कोरोनाच्या या जागतिक संकटाच्या काळातही अधिकाधिक प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि अव्याहतपणे आम्ही संसर्ग रोखण्यासाठी काम करत आहोत. मागच्या आठ महिन्याच्या काळात जिल्ह्यासाठी ठळक गोष्टी केल्या त्याचा हा लेखाजोखा आपल्या समोर ठेवत आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

राज्याचा सहकार मंत्री म्हणून काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ ही योजना २७ डिसेंबर २०१९ रोजी जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ रोजी पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही योजना पूर्णत: संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या योजनेत ३१.६९ लाख पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून ३१ जुलै २०२० अखेर २८.८४ लाख खातेदारांना १८,५४२ कोटी एवढ्या रक्कमेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याचीही कार्यवाही सुरु आहे. पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ अद्याप झालेला नाही अशा खातेदारांच्या कर्जखात्यावर रक्कम शासनाकडून येणे दर्शवून पात्र लाभार्थ्यांना खरीप २०२० साठी कर्ज वितरणास पात्र समजण्यात यावे, असाही निर्णय घेण्यात आलेला आहे.

राज्यातील २ लाख सहकारी संस्थांपैकी प्रत्येक वर्षी सुमारे ४० हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यात येत असतात. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.

महात्मा जोतिराव फुले योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील ५६ हजार २५६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३५३ कोटी ६३ लाख इतकी रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे.

पीक कर्ज योजना

सन २०२०-२१ यावर्षातील खरीप हंगामासाठी राज्याचा  ४५,७८५ कोटी रुपये एवढा लक्षांक निश्चित करण्यात आला आहे. त्यापैकी ०१/०४/२०२० ते ३१/०७/२०२० या कालावधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी सुमारे ३०.२२ लाख शेतकऱ्यांना रु. २२,७६२ कोटी एवढा पीक कर्जपुरवठा केला आहे. विशेषत: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी त्यापैकी

२१.३५ लाख शेतकऱ्यांना सुमारे रु. ११,५७४ कोटी एवढा पीक कर्ज पुरवठा केला आहे. कर्ज वाटपाचे हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ३८% टक्के जास्त आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार केला असता खरीप हंगामासाठी १६०० कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार २ लाख ४८ हजार ३२८ शेतकऱ्यांना एकूण १५७० कोटी ५० लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी ९८ इतकी आहे.

बांधावर खत व बियाणे वाटप

कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी लागणारे खते, बियाणे खरेदी करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी कृषी विभागामार्फत बांधावर खते व बियाणे वाटप मोहिम राज्यात सुरु केली. ही मोहिम सातारा जिल्ह्यात राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यात २१ हजार १८१ शेतकऱ्यांना १०३८ गटांमार्फत ६०१८.६२ मे. टन खते व ३१७८.८३ क्विंटल बियाणांचे वाटप करणयात आलेले आहे.

पीक विम्यात स्ट्रॉबेरीचा समावेश

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश नसल्याने तो करण्याविषयी शेतकऱ्यांची मागणी होती. यासाठी पाठपुरावा केल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश पीक विमा योजनेमध्ये या वर्षापासून करण्यात आला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी व महाबळेश्वर महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पीक विमा योजनेमध्ये होण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होती. याचाही पाठपुरावा केल्यान चालू खरीप हंगामापासून महाबळेश्वर व पाचगणी महसूल मंडळातील भात पिकाचा समावेश पीक विमा योजनेंतर्गत करण्यात आलेला आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना आता ऐच्छिक स्वरुपाची करण्यात आली आहे. फळ पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील ४ हजार ९०२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून २ हजार ४२२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील २६ हजार ४०६ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदिवला असून १० हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. ही आकडेवारी अंतिम नूसन १८ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. यात अजून शेतकऱ्यांची भर पडेल.

लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीयांना सोडले घरी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिहवन महामंडळाच्या सातारा विभागामार्फत ७ मे रोजी सातारा ते पाँडेचरी २३ प्रवासी, सातारा ते राजस्थान येथील राणिवाडा २३ प्रवासी, वडूज राणिवाडा २२ प्रवासी असे एकूण ६८ प्रवासी एसटी महामंडळाच्या बसेसने सोडण्यात आले. ९ मे रोजी सातारा-वडूज ते भंडारा २२, १० मे रोजी मेढा ते उत्तर प्रदेशात येथील वाराणसी येथे २३ असे एकूण ४५ प्रवासी सोडण्यात आले.

११ मे रोजी वडूज ते कर्नाटक राज्यातील हल्ल्याळ येथे २२, कराड ते तामिळनाडू येथील शेलम  ९ एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. यातून २०१ प्रवासी सोडण्यात आले. सातारा ते मध्य प्रदेश येथील सुलतानपूर येथे २३ प्रवासी सोडण्यात आले. तसेच महामंडळाच्या सातारा विभागामार्फत हैद्राबाद व गुलबर्गा येथे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजूरांना सोडण्यात आले.

केंद्र शासनाने कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन केल्यानंतर महाराष्ट्रात काम करणारे परराज्यातील नागरिक हे आपापल्या गावी जात होते. अशा २७७ नागरिकांची राहण्याची, जेवणाची उत्तम सोय सातारा जिल्हा प्रशासनाने चांगल्या पद्धतीने केली होती.

कोविड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे १.४१ लाख ऊस तोडणी कामगार संबंधित साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अडकले होते. या कामगारांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत सहकार विभागामार्फत निर्णय घेण्यात आला. या निर्णया नुसार राज्यातील ४४ साखर कारखान्यांनी १.४१ लाख ऊसतोडणी कामगारांना कारखान्याच्या खर्चाने विशेष वाहनाद्वारे पाठविण्यात आले आहे. तसेच कारखान्याचा गाळप हंगाम बंद झाल्या पासून या कामगारांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्यापर्यंत त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था संबंधित कारखान्याच्या खर्चाने करण्यात आली आहे. यासह अनेक महत्त्वाचे हिताचे निर्णय सहकार विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत.

अन्नधान्याचा पुरवठा

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जुलै या कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत ५१५०.३७ मे. टन गहू व २९११०.४६ मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत याच कालावधीत ४०५३०२ शिधापत्रिकाधारकांना २१६४०.१९ मे. टन गहू व १३८०१.२ मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले.

पर राज्यात चालत चाललेल्या मजूरांची केली राहण्याची सेाय

यशोदा शिक्षण प्रसारक, मंडळ, सातारा येथे १६४, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील महाविद्यालयाच्या वसतिगृहात ५६ तर पाच पांडव आश्रमशाळा, अलगुडेवाडी ता. फलटण येथे ५७ असे एकूण २७७ नागरिकांची राहण्याची सोय जिल्हा प्रशासनाने केली होती. या सर्वांना सकाळी नाष्टा, दुपारी व रात्रीचे जेवण प्रशासनामार्फत देण्यात येत होते. काही स्वयंसेवी संस्थांनीही पुढकार घेतला होता. त्यांच्यावतीने या २७७ नागरिकांना जेवण देण्याचे काम केले.

साताऱ्यात कोरोना टेस्टिंग लॅब

साताऱ्यात मध्यवर्ती ठिकाणी कोरोना टेस्टिंग लॅब असावी अशी सर्वांची इच्छा होती. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीच्या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर लॅब सुरु करण्यात आलेली आहे. या लॅबममधून रोज ३८० जणांचे नमुने तपासले जाणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल २४ तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय

स्वराज्याची राजधानी, छ. शाहूंची नगरी, राजघराण्याची गादी आणि सह्याद्रीच्या कुशीत जाज्वल्ल्य इतिहासाची साक्ष देत उभा असलेला अजिंक्यतारा. असे ऐतिहासिक वारसा लाभलेला सातारा. याच साताऱ्याला आता श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपुर्ण गौरवशाली इतिहास पुढच्या काही दिवसांमध्ये नवीन वस्तु संग्रहालयाच्या माध्यमातुन उलगडणार आहे.  छ. शिवाजी राजेंच्या यापुर्वी असलेल्या वस्तु संग्रहालयातुन आजतागायत इतिहास समजत होता. याठिकाणी ही अनेक शिवकालीन वस्तु, शस्त्रात्र, चित्रे यांचा संग्रह आहे. परंतु हा संग्रह मर्यादित जागेत सामावला आहे. तसेच त्यांची मांडणी व सजावट ही देखील जुन्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे नवीन जागेत हे संग्रहालय स्थलांतरित करुन, रंगरुप देऊन पुढच्या अनेक पिढ्यांसाठी ह्या स्मृती जागृत ठेवणे गरजेचे आहे. तब्बल ३ हजार ५०० चौ. मी. क्षेत्रामध्ये १४ मोठ्या दालनांसह श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे नवीन वस्तू संग्रहालय अंतिम टप्प्यात आहे. गढीवजा रचनात्मक बांधकाम, वस्तू पाहण्यासाठी प्रशस्त जागा, अत्याधुनिक प्रकाश संयोजन, क्युरिओ शॉप, वाचनालय अशा काही विषेश वैशिष्ठ्यांसह इमारत लवकरच सज्ज होत आहे. आपण साताऱ्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह संग्रहालयाची पाहणी केली आहे. सन १९-२० च्या अर्थ संकल्पात १२ कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. कोरोना च्या काळात निधीची अडचण आली तरी आपण पाठपुरावा करुन सातारकरांचे भव्य स्वप्न पूर्णत्वास नेवू.

शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळी योजना २६ जानेवारी पासून अंमलात आली. ही योजना एप्रिल २०२० पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मुख्यालयाच्या ठिकाणी ४ केंद्रे व तालुकास्तरावर २७ असे एकूण ३४ केंद्रावर ही योजना कार्यान्वित आहे. योजना सुरु झाल्यापासून म्हणजेच २६ जानेवारी पासून ते ३१ जुलै पर्यंत २१०० थाळी या प्रमाणे एकूण २ लाख ८१ हजार ३०० इतक्या शिवभोजन थाळ्या वितरित करण्यात आलेल्या आहेत.

मेडिकल कॉलेज

कृष्णा विकास महामंडळाची सातारास्थित ६१. ५ एकर ऐवढी जागा वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यासाठी ही बाब प्रगतीपथावर आहे. अनेक वर्षापासूनचे मेडिकल कॉलेज स्वप्न सत्यात उतरणार आहे.

मागच्या आठ महिन्यात या काही ठळक कामांना गती देण्यात आली आहे. यापुढे यापेक्षा अधिक वेगाने या जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्याचा मान आणि प्रगतीचे नवनवे मापदंड निर्माण करत राहू या.

बाळासाहेब पाटील

सहकार, पणन तथा पालकमंत्री, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here