अमरावती, दि. १४ : सालोरा (आमला) येथील पुल वाहून गेल्याच्या घटनेची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
प्रधानमंत्री/ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्यातील रस्ते विकासाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, प्रधानमंत्री/ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सालोरा (आमला) येथील पुलाचे काम विहीत मुदतीत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जीवितहानी झाल्याची तक्रार आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी. कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच इतर दोषींवरही कारवाई व्हावी, असे निर्देश देतानाच, कुठल्याही कामात कुणाकडूनही हलगर्जीपणा किंवा कुचराई खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे. नागरिकांच्या जीवाशी खेळ झालेला खपवून घेणार नाही. कामे मुदतीतच पूर्ण झाली पाहिजेत. पावसाळा लक्षात घेता जीवितहानी, वित्तहानी तसेच अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील आवश्यक रस्ते, पूल व इमारतींची कामे प्राधान्यक्रम लक्षात घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सालोरा (आमला) येथील पुल तुटल्यामुळे पुराचे पाणी शेतात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करुन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे आदेश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना तत्काळ सानुग्रह मदत निधी देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रस्ते, पुलांची निर्मिती ही दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहीजे. नागरी सुविधा संदर्भात कुठलीही तक्रार येता कामा नये. डेहणी ते तिवसा, देवरी ते जवळा या रस्ते निर्मितीची कामे तातडीने पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागाने नियोजनपूर्वक कामे करावी, असेही श्रीमती ठाकूर यांनी बैठकीत सांगितले.