सर्व मिळून प्रयत्न करू या, कोरोनाला हरवू या! : पालकमंत्री अब्दुल सत्तार

धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी, नागरिकांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला सहकार्य करीत कोरोना विषाणूची साखळी खंडित करावी. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास कोरोना विषाणूवर नक्कीच विजय मिळविता येईल, असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा आज सकाळी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, महापौर चंद्रकांत सोनार, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बडे- मिसाळ, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे (निवडणूक), सुरेखा चव्हाण (भूसंपादन), गोविंद दाणेज (रोहयो), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर आदींसह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  

पालकमंत्री श्री. सत्तार आपल्या भाषणात पुढे म्हणाले,  गेल्या मार्चपासून कोरोना विषाणूच्या महामारीने सर्वांनाच वेठीस धरले आहे. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या या विषाणूचा सामना करण्यासाठी आपली सर्व यंत्रणा दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. धुळे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यातून सुटलेला नाही. मात्र, जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि पोलिस प्रशासनाने त्याच्यावर नियंत्रण ठेवले आहे. त्याच्यावर नियंत्रण ठेवून भागणार नाही, तर त्याला संपूर्णपणे आटोक्यात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाठिशी राज्य शासन भक्कमपणे उभे आहे. कोरोना विषाणूबरोबर लढताना दैनंदिन जनजीवन सुरळीत करण्यासाठी ‘मिशन बिगेन अगेन’ सुरू केले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असून लवकरच जनजीवन सुरळीत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, नगरविकास शाखा, पोलिस अधीक्षकांसह महसूल विभागास 11 कोटी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांनी स्थलांतर केले. त्यांना जिल्हा प्रशासनासह स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी मदत केली. ते सुध्दा अभिनंदनास पात्र आहेत. कोटा येथे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यात एसटीच्या धुळे विभागाचे योगदान राहिले आहे. धुळे जिल्ह्यात अडकलेले नागरिक, रुग्णांना आपापल्या गावी किंवा रुग्णालयात औषधोपचारासाठी जाणाऱ्यांना एक लाखावर पास आपल्या प्रशासनाने वितरीत केले आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

लॉकडाऊनच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील शिवभोजन योजना चांगलीच यशस्वी ठरली आहे. धुळे जिल्ह्यात 15 शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून 2 लाख 20 हजार गरजू नागरिकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे. याशिवाय विविध योजनांच्या माध्यमातून माहे एप्रिल ते जुलै 2020 या कालावधीत 25 हजार 483 टन गहू, 39 हजार 78 टन तांदूळ, 828 टन डाळीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना केले आहे. तसेच राज्य शासनाने आत्मनिर्भर योजनेंतर्गत ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नाही, असे नागरिक, स्थलांतरीत, बेघर मजुरांना प्रती व्यक्ती मोफत पाच किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

गेल्या वर्षी पीक विमा घेणाऱ्या  66 हजार 70 शेतकऱ्यांना तब्बल 97 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला. आपल्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून  42 हजार 470 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 321 कोटी 67 लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील 35 हजार 190 शेतकऱ्यांना 275 कोटी 15 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरीत केले आहे. धुळे जिल्ह्यातील 14 हजार 352 शेतकऱ्यांकडील 4 लाख 56 हजार 555 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. याशिवाय 2 लाख 70 हजार क्विंटल मका, 44 हजार 464 क्विंटल ज्वारी, 14 हजार 846 क्विंटल तूर आणि 1 लाख 41 हजार क्विंटल हरभराची खरेदी पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे बाधित  2 लाख 78 हजार 167 शेतकऱ्यांना 244 कोटी 87लाख 6 हजार 75 रुपयांच्या अनुदानाचे वाटप केले आहे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 73 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली आहे. धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 4 लाख 5 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांचा पेरा झाला आहे. त्यात 2 लाख 39 हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झालेली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 2 लाख 50 हजार 944 शेतकऱ्यांचा डाटा संबंधित पोर्टलवर अपलोड केला आहे. त्यापैकी 2 लाख 699 एवढ्या शेतकऱ्यांचा डाटा पीएफएमएसने स्वीकृत केला आहे. त्यापैकी 1 लाख 80 हजार 225 शेतकऱ्यांना पहिला हप्ता, 1 लाख 74 हजार 262 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता, 1 लाख 58 हजार 890 शेतकऱ्यांना तिसरा हप्ता, 1 लाख 33 हजार 295 शेतकऱ्यांना चौथा हप्ता, तर 55 हजार 790 शेतकऱ्यांना पाचवा हप्ता अशाप्रकारे अनुदान वाटप केले आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना 1 लाख 79 हजार 223 दाखल्यांचे वाटप केले आहे, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील पाच महिन्यांपासून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या ‘कोरोना’ योध्द्यांचा पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. प्रमुख सत्कारार्थींची नावे अशी : डॉ. हितेंद्र देशमुख, आरोग्य सेविका सखूबाई बागूल, आरोग्य सेवक शरद खैरनार, आशा कार्यकर्त्या मनीषा कृष्णराव मराठे, अंगणवाडी कार्यकर्त्या तुळसाबाई कृष्णा पाटील, परिचर अभिषेक सुनील गायकवाड, नाझीम बेग रहिम बेग मिर्झा (सर्व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद). डॉ. विशाल पाटील, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. ध्रुवराज वाघ, डॉ. अर्जुन नरोटे, दीपाली मोरे, तृप्ती आरोळे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभय शिनकर, तुषार प्रमोद पवार (कै. प्रमोद पवार यांचे पुत्र), रशीद अन्सारी (सर्व जिल्हा रुग्णालय). डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. दीपक शेजवळ, गणेश वाघोरे, विद्या गुडवाल, सुहासिनी गावित, संतोष चौधरी, विजय सारवान, राजरत्न अहिरे (सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय). डॉ. एम. आर. शेख, डॉ. प्रशांत मराठे, मनोहर सूर्यवंशी, चंद्रकांत जाधव, लक्ष्मण पाटील, भरत येवलेकर, विकास सावळे, इफ्तेखार उस्मान, मुन्ना मन्वर, प्रियांका वसावे, नीता चौधरी (सर्व महानगरपालिका आरोग्य विभाग). अनुप अग्रवाल, राजेंद्र वालचंद शिंदे, राजेंद्र बंब, शाहबाज फारूख शाह, जी. एम. धनगर, धनंजय सोनवणे, योगेश राऊत, कुमारपाल कोठारी (स्वयंसेवी व्यक्ती, स्वयंसेवी संघटना, संस्था). डॉक्टर क्लब शिरपूर, दोंडाईचा, बी. व्ही. पाटील (शिरपूर), तुषार पवार (शिंदखेडा). सचिन शालिकराव साळुंखे सहाय्य पोलिस निरीक्षक (थाळनेर पोलिस ठाणे), ज्ञानेश्वर झिंगा पाटील (हवालदार). डॉ. गिरीश ठाकरे, आसिफ दौलत पटेल (कोरोना विषाणूवर मात). कृष्णा राठोड (जिल्हा बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरिक क्षेत्र, धुळे) यांचा समावेश आहे. जगदीश देवपूरकर, वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले.     

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे ऑनलाइन उदघाटन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अर्थात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील नवीन इमारतीत अतिदक्षता विभागातील 55 व 60 ऑक्सिजनयुक्त बेड, शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथील ऑक्सिजनयुक्त 50 बेड, अजमेरा आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड हेल्थ सेंटर, जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयातील 100 बेड ऑक्सिजनयुक्त कोविड हेल्थ सेंटरसह महिला व बालविकास भवनचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा रुग्णालयात उदघाटन

जिल्हा सामान्य रुग्णालयात नव्याने उभारलेल्या आणि महानगरपालिका, धुळे संचलित डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील ऑक्सिजनयुक्त 60 बेडच्या कोविड हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते आज सकाळी झाले. यावेळी आमदार कुणाल पाटील, आमदार श्रीमती गावित, जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथ सी., पोलिस अधीक्षक श्री. पंडित, महानगरपालिका आयुक्त श्री. शेख, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी कोविड सेंटरची पाहणी करून विविध सूचना केल्या.  त्यानंतर पालकमंत्री श्री. सत्तार यांनी अजमेरा आयुर्वेद रुग्णालयातील कोविड हेल्थ केअर सेंटरला भेट देवून तेथील खासगी प्रयोगशाळेची पाहणी केली.

जवाहरकोविड हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन

जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोविड हेल्थ केअर सेंटरचे उदघाटन पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. या सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त 100 बेड आहेत. यावेळी फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सत्तार यांनी कोविड सेंटरची पाहणी केली.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रीय छात्रसेनेच्या जवानांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. अपर तहसीलदार संजय शिंदे, नायब तहसीलदार बी. बी. पावरा यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.