शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते महिला व बाल विकास भवन कक्षाचे उद्घाटन

महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली

वाशिम, दि. १५ : जिल्हा परिषदेच्या तळमजल्यावर तयार करण्यात आलेल्या महिला व बाल विकास भवन कक्षाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज झाले. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी हा कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामुळे महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, असे मत श्रीमती गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आमदार अमित झनक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, महिला व बाल कल्याण सभापती शोभाताई गावंडे, शिक्षण सभापती चक्रधर गोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी, मदन नायक, महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य मीनाक्षी पट्टेबहादूर, श्रीमती मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची कार्यालये एकाच धताखाली आणल्यास लाभार्थ्यांना लाभ घेणे सोयीचे व्हावे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होऊन नागरिकांना गैरसोय टाळता यावी, यासाठी जिल्ह्यात सामाजिक न्याय भवनच्या धर्तीवरील महिला व बाल विकास भवन उभारण्यात येणार आहे. याकरिता आगामी काळात जिल्हा नियोजन समितीमधून १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरिता जागा निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. सध्या तात्पुरत्या स्वरुपात महिला व बाल विकास भवन कार्यान्वित करण्यात आले असून याठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांचा प्रत्येकी एक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.

नियमित कार्यालयीन वेळेत हे कार्यालय सुरू राहणार आहे. सर्व वयोगटातील महिला, मुलींसाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय यंत्रणा राबवित असलेल्या योजनांची माहिती, योजनांसाठी अर्ज कसा करावा? कायदेशीर मार्गदर्शन, समुपदेशन या कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहुर्ले यांनी यावेळी दिली.