यवतमाळ, दि.११ : – वन विभागातील फ्रंटलाइन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष वन्यजीव व वन संरक्षण करताना हौतात्म्य आल्यास सानुग्रह अनुदान देण्याबाबतची योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार असून प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. यवतमाळ येथे आज राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात वन हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री श्री.राठोड म्हणाले,आपला समाज हा पूर्वीपासूनच निसर्गपूजक म्हणून ओळखला जातो. जंगले वाढली तरच मानवाचा या धरतीवर टिकाव लागेल. जंगलांचे महत्त्व संतांनीसुद्धा वर्णिले आहे. 11 सप्टेंबर 1738 रोजी, स्थानिक राजाने दिलेल्या वृक्षतोडीच्या अयोग्य आदेशाविरूद्ध, राजस्थान येथील बिष्णोई समाजाच्या 363 व्यक्तींनी आपले बलिदान दिले होते. राज्यात सुद्धा अनेक वन अधिकारी व कर्मचारी यांनी वन्यजीव व वने यांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. वन्यजीव व वन संरक्षणासाठी वन अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले बलिदान हे नक्कीच प्रेरणादायी व स्फूर्तिदायक आहे. त्यांच्या या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ नागपूर येथे वन हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. त्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात वन हुतात्मा स्मारक उभारण्यात येणार आहे.
वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे ही वन विभागाची प्राथमिकता आहे. त्या अनुषंगाने राज्यात वन अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत आपण वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करत आहोत. आजही वन्यजीव यांची शिकार आणि नैसर्गिक संसाधनांची तोड व चोरटी वाहतूक रोखण्यासाठी अनेक वनाधिकारी आणि वन कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. बऱ्याच वेळा असे संरक्षण करत असताना अशा अधिकारी व कर्मचारी, विशेषतः फ्रंटलाईन अधिकारी व कर्मचारी जसे वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वन रक्षक, वाहनचालक यांच्यावर प्राणघातक हल्ले होत असतात. अशा हल्यात बऱ्याच वेळा त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. अशी दुर्दैवी घटना घडल्यास अशा अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी सानुग्रह अनुदान देण्याची योजना लवकरच मंत्रिमंडळासमोर आणणार असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.
देवेंद्र पाटील/वि.सं.अ./11.09.2020