भंडारा दि. 19 : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांच्या प्रत्यक्ष तपासणीवर भर देण्यात यावा. कोरोना संसर्गजन्य आजार असून नागरिकांच्या मनात कोरोना विषयी भीतीचे वातावरण आहे. कोरोना हा महाभयंकर नसून केवळ आजार आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीच्या माध्यमातून लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करावी, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. लाखनी येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसिलदार मलिक विराणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानतोडे, गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लाखनी तालुक्यात शहरी व ग्रामीण मिळून 649 कोविड रूग्ण असून त्यापैकी 553 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या क्रियाशील रूग्ण 88 असून 75 रूग्ण गृह विलगिकरणात आहेत. 8 रूग्ण कोविड केअर सेंटरमध्ये असून 5 भंडारा येथे आहेत. लाखनी तालुक्यातील मृतांची संख्या 8 एवढी आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत 1 लाख 29 हजार 316 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 117 व्यक्ती आयएलआय संक्रमित आढळून आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी लाखनी तालुक्यातील 80 गावांना ग्राम भेटी दिल्या. लाखनी प्रशासनाने ग्राम भेटीचा अभिनव उपक्रम राबविला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांच्या तपासणी सोबतच कोरोना विषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यावर भर देण्यात यावा, अशा सुचना नाना पटोले यांनी केल्या. नागरिक आजार अंगावर काढतात ही बाब योग्य नसून सर्दी, ताप, खोकला, घसा खवखव करणे, तोंडाची चव जाणे असे लक्षणं आढळताच तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तपासणीला उशीर झाल्यास धोका वाढून मृत्यू ओढवू शकतो, ही बाब लक्षात घेता नागरीकांनी स्वयंस्फुर्तपणे तपासणी करून घ्यावी. सध्या सण उत्सवाचा काळ असून या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी मास्क हेच कोरोनावर औषध असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या गावांना बक्षिस- पुरस्कार देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी सुचना विधानसभा अध्यक्षांनी मांडली. सध्या दुर्गा उत्सव सूरू असून या निमित्ताने कोरोना मुक्तीसाठी वेगळे प्रयत्न करणाऱ्या गावांचा यात समावेश करता येईल असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी कोरोनाचा अलर्ट असून सतर्कता बाळगावी. मास्कचा वापर, साबनाने नियमित हात धूणे व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन प्रत्येकाने करावे असे आवाहन त्यांनी केले.
000