मुंबई, दि. २२ – पदवी प्राप्त करणे ही जीवन शिक्षणाची केवळ सुरुवात आहे. युवकांनी डोळ्यांपुढे मोठे लक्ष्य ठेवावे, निवडलेल्या क्षेत्रात नवसृजन करावे व ध्येयसिद्धीसाठी कठोर परिश्रम करावे. देशासाठी परिश्रम केले तर त्यात आपले हित आपसूकच साधले जाईल. युवकांनी परिश्रमांना सदाचाराची जोड दिल्यास सशक्त, समर्थ व आत्मनिर्भर भारत निर्माण करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षान्त समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख, विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपालांनी ‘सदाचार हा थोर सांडूं नये तो, जनीं तोचि तो मानवी धन्य होतो’ हे समर्थ रामदास यांचे वचन उद्धृत केले. ते म्हणाले समाजात कित्येकदा मोठमोठ्या लोकांचे नैतिक अध:पतन झालेले दिसते, त्यामुळे युवकांनी सद्गुणी व सदाचारी लोकांची संगत ठेवल्यास जीवन सफल होईल.
सुवर्ण पदक तसेच पीएचडी प्राप्त स्नातकांचे अभिनंदन करताना युवकांनी मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आदी योजनांचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे, अशी सूचना राज्यपालांनी आपल्या भाषणात केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ सोलापूर या एका जिल्ह्यासाठी कार्यरत असलेले राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे असे नमूद करून विद्यापीठाने विडी कामगार व वस्त्रोद्योग कामगारांच्या कौशल्य वर्धनासाठी प्रयत्न करावे अशी सूचना माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केली.
सोलापूर जिल्ह्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात इतरत्र स्थलांतर होते. हे स्थलांतर थांबविण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या, सोलापूर हे आरोग्य सेवेचे मोठे केंद्र व्हावे, जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन क्षेत्रे अधिक प्रकाशात यावी व कृषी पर्यटनाला चालना मिळावी, अशी अपेक्षा श्री. देशमुख यांनी व्यक्त केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कौशल्य विकासाचे ९२ अभ्यासक्रम राबविले जात असून विद्यापीठातर्फे कम्युनिटी रेडिओ, अर्थशास्त्र प्रयोगशाळा व पुरातत्व संग्रहालय निर्माण करण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी आपल्या अहवालामध्ये दिली.
यावेळी चार गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके तर ४ स्नातकांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यापीठ स्तरावर जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी हे पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले.
Governor presides over 16th Convocation of Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University
The Governor of Maharashtra and Chancellor of Universities Bhagat Singh Koshyari presided over the 16th Convocation of the Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur through online mode from Raj Bhavan Mumbai.
Degrees, diplomas, Ph.D. and Gold Medals were presented to gradating students. Former Minister Subhash Deshmukh, Vice Chancellor Dr. Mrunalini Fadanvis, Pro Vice Chancellor Dr. Debendranath Mishra, members of various boards of authorities, teachers and students were present.