मुंबई, दि. 24: पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरामध्ये हरणतळे या ठिकाणी क्रीडा संकुल निर्मिती संदर्भात क्रीडा व पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीस दूरदृश्य प्रणालीने क्रीडा आयुक्त श्री. ओमप्रकाश बकोरीया, क्रीडा विभागाच्या उप सचिव श्रीमती नानल, उपायुक्त पुणे श्रीमती रंजना गमे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, क्रीडा विभागाचे कक्ष अधिकारी श्री. कदम, तहसिलदार श्री. कोळी, उप अधीक्षक भूमि अभिलेख श्री. गौरकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, पुण्यासारख्या मोठ्या शहरात जागा उपलब्ध असणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. महसूल विभागामार्फत या जागेचे सर्वेक्षण करावे. या नियोजित क्रीडा संकुलासाठी निकषांनुसार आराखडा तयार करण्यात यावा,असे निर्देश राज्यमंत्री तटकरे यांनी दिले.
येथे असलेल्या तलावामध्ये साहसी क्रीडा प्रकारांसाठी तेथील सुरक्षितता पडताळणी, क्रीडा पर्यटनविषयक बाबी, सुशोभीकरण आदी माध्यमातून येथे क्रीडा व पर्यटन विकास करण्यासाठी विभागामार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जावेत. त्याअनुषंगाने क्रीडा विभागामार्फत संरक्षक भिंत बांधणीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशाही सूचना राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.
पर्यटनाचा ‘ब’ दर्जा असलेल्या हरणतळे या ठिकाणी उपलब्ध सुमारे 5 हेक्टर क्षेत्रफळ क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या शासकीय जमिनीचा क्रीडा संकुलनिर्मितीमधून साहसी क्रीडा व त्यातून पर्यटननिर्मिती उद्देश असल्याचे आमदार श्री. सुनिल टिंगरे यांनी सांगितले.