मुंबई, दि. 22 : आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक बँक सहाय्यित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत (NCRMP) किनारी जिल्ह्यातील भूमिगत विद्युत वाहिनी, खारप्रतिबंधक बंधारे इत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन संचालक लहू माळी, अवर सचिव श्रीरंग घोलप व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.वडेट्टीवार म्हणाले, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राज्याच्या किनारी जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यासाठी केंद्र शासन, जागतिक बँक, महाराष्ट्र शासन यांच्यात दि. 11 ऑगस्ट 2015 रोजी करार करण्यात आला आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांना वादळ, चक्रीवादळ इत्यादींमुळे असलेला धोका विचारात घेऊन सुरु असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासन/केंद्र शासन यांच्याकडे देखील पाठपुरवठा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
NCRMP अंतर्गत प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक निधीसाठी पाठपुरावा करावा. राज्यात सर्व जिल्ह्यांत वीज अटकाव यंत्रणा टप्पा क्रमांक दोनची कामे पूर्ण करावीत यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना प्राधान्य द्यावे. तसेच राज्यात स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्याबाबत सविस्तर अहवाल तयार करावा, असे निर्देशही श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
००००