ठाणे दि. २७ (जिमाका) : आपला मास्क हीच आपली सुरक्षा आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला ठाणे ग्रामीण कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
भिवंडी तालुक्यातील सवाद येथे उभारण्यात आलेल्या ठाणे जिल्हा ग्रामीण कोविड रुग्णालयाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, खा. कपिल पाटील, विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक, विधानसभा सदस्य विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भाऊसाहेब दांगडे, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार, यांच्या उपस्थित झाले.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरुवातीपासून लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील होते. जिल्ह्यात आवश्यकता भासेल त्याप्रमाणे अगदी कमी वेळात रुग्णालये उभारण्यात आले आहेत. ठाणे येथे ग्लोबल हॉस्पिटल अवघ्या २२ दिवसात विविध संस्थांच्या मदतीने उभारण्यात आले. वेगवेगळ्या रुग्णालये उभारताना राहिलेले व नंतर जाणवलेल्या सर्व त्रुटी हे ग्रामीण रुग्णालय उभारताना लक्षात घेतल्या आहेत. ग्रामीण भागातील जनतेसाठी अद्ययावत व सुसज्ज असे ग्रामीण कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाचे हे काम कौतुकास पात्र आहे.
राज्य शासनाने अर्थसंकल्पात या रुग्णालयासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना संपल्यानंतर हे रुग्णालय कायमस्वरुपी ग्रामीण रुग्णालय करण्यात येणार असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
आज राज्यात लसीकरण सुरु झाले असले तरी आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शासनाने जबाबदारी घेतली आहे. पण नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. जनतेने नियम पाळले नाहीतर शासन व जिल्हा प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागतील. सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी यावेळी केली. यावेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, खासदार कपिल पाटील यांची भाषणे झाली.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी प्रास्तविकामध्ये सांगितले ठाणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रामुख्याने ग्रामीण भागातील कोविड रुग्णांच्या सेवेसाठी ठाणे ग्रामीण कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यात भिवंडी पासून ६ किलोमीटर अंतरावर तसेच मुंबई नाशिक महामार्ग पासून ५ किलोमीटर अंतरावर १लक्ष ७४ हजार ९०० चौरसफूट अशा प्रशस्त जागेत खाजगी उद्योजकाचे गोदाम वखार अधिग्रहीत करण्यात येऊन ७३८ खाटांचे ऑक्सिजन पुरवठ्याने युक्त व ८० खाटांचे अतिदक्षता विभाग असे एकूण ८१८ खाटांचे कोविड रुग्णासाठी सर्व सोईचे अद्ययावत रुग्णालय बांधण्यात आलेले असल्याचेही श्री. नार्वेकर यांनी सांगितले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रार्थमिक आरोग्य केंद्र पडघा येथे उभारण्यात आलेल्या मॉलिक्यलर सोल्युशन कोविड-१९ आर.टी.पी.सी.आर. प्रयोगशाळेचेही लोकार्पण करण्यात आले.
उपविभागीय आधिकारी मोहन नळदकर यांनी आभार प्रदर्शन केले.