अमरावती, दि. 1 : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवला. त्यांच्या कार्याने पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली व महाराष्ट्र सदोदित देशात अग्रेसर राज्य राहिले, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्राच्या प्रांगणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. वायुनंदन नाशिकहून आभासी पध्दतीने उपस्थित होते. कार्यक्रमाला कुलसचिव दिनेश भोंडे, विभागीय संचालक अंबादास मोहिते, डॉ. संजय खडतकार, डॉ. नारायण मेहरे, पी. के. मोहन, उपकुलसचिव चंद्रकांत पवार, विवेक ओक, आर्कीटेक्ट वर्षा वऱ्हाडे, गणेश खारकर, जयंतराव देशमुख, हरीभाऊ मोहोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्व. चव्हाण यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास मिळाले, ही माझ्यासाठी सौभाग्याची बाब आहे. त्यांच्या प्रेरणादायी व्यक्तीमत्वापासून आम्हा सर्वांना प्रेरणा, शिकवण मिळत असते. विद्यापीठाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.
याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वनौषधींचे उद्यान परिसरात विकसित करण्यात येत असल्याची माहिती श्री. मोहिते यांनी यावेळी दिली. श्री. मोहिते यांनी प्रास्ताविक केले. संजय खडसे यांनी आभार मानले. सुरज हेरे यांनी सुत्रसंचालन केले.