मुंबई दि.5 :- इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसेच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे,सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, इमाव व बहुजन कल्याण विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयासाठी सामाजिक न्याय विभागाने सामाजिक न्याय भवनात जिथे जागा उपलब्ध आहेत तिथे जागा उपलब्ध करून द्यावी. विभागाच्या योजना, शिष्यवृत्ती यासह आवश्यक निधी बाबत प्राधान्यक्रम निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत.
मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, इमाव विभागाचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र आस्थापना व्हावी. कल्याणकारी योजनांकरिता, तसेच शिष्यवृत्तीसाठी, वसतिगृहांसाठीचे अनुदान तसेच विविध महामंडळांसाठीही निर्धारित केलेला निधी मिळावा.
यावेळी महाज्योती संस्थेसाठी आकृतिबंधानुसार पदभरती, आश्रमशाळांसाठी आवश्यक पदभरती याबाबतही चर्चा झाली.