मुंबई, दि. 21 : वसमत येथील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर उपलब्ध होण्यासाठी नवीन योजना सुरु करण्यात येत असून या योजना येत्या महिन्याभरात कार्यान्वित होतील असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन अभियान अंतर्गत कामांबाबत आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार संतोष माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, जल जीवन अभियनाचे संचालक, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबादच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, जल जीवन मिशन अंतर्गत 4 नवीन योजना सुरु करण्याचे प्रस्तावित असून याबाबतचे नियोजन करण्यात यावे. या नवीन योजना सुरु करताना प्रादेशिक पाणी पुरवठा येाजना सुरुच ठेवण्यात याव्यात. प्रादेशिक योजनांची अंमलबजावणी, गावांचा सातत्याने होणारा पाणीपुरवठा, थकीत वीज बिले, पाईपलाईन जोडणी याबाबतही नियोजन करण्यात यावे, असेही श्री.बनसोडे यांनी सांगितले.
0000