पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मान्यवरांनी मनोगतातून केले अभिवादन
नाशिक दिनांक 14 नोव्हेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी हा देशाचा मूळ निवासी असून त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यांना त्यांचे हक्क देण्याची त्याचा सन्मान देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. या जबाबदारीतूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बिरसा मुंडा यांच्या स्मृतींसोबत क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय क्रांती स्मारकाच्या माध्यमातून व बाडगीच्या माचीचा सन्मान या निमित्ताने करण्यात येत आहे, असे प्रतिपादन खासदार शरदचंद्र पवार यांनी आज केले आहे.
ते आज इगतपुरी तालुक्यातील वासोळी येथे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन व आदिवासी सांस्कृतिक महोत्सव २०२१ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,पद्मश्री राहीबाई पोपरे,आमदार हिरामण खोसकर, आमदार दौलत दरोडा, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार नितीन पवार, आमदार किरण लोहमटे,आमदार सुनिल भुसारा, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले, बिरसा बिग्रेड सह्याद्रीचे अध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सतिष पैंदान आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार शरदचंद्र पवार म्हणाले की, आदिवासी बांधव हे पिढ्यान् पिढ्या देशाचे मूळ मालक आहेत. जल जमीन आणि पर्यवरणाचे रक्षण करण्याचे काम आदिवासी बांधावाकडून केले जात आहे. त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध कार्यक्रम राबवत आहे, आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. सामाजिक परिवर्तन सामाजिक
न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारीही पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत, असेही यावेळी खासदार श्री. पवार यांनी सांगितले.
आदिवासी समाजातील इतर घटक यांच्यात अंतर ठेवण्याचे कुठलेही कारण नाही. अठरा पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी राज्य केलं त्यामुळेच ते रयतेच राज्य म्हटले जाते. राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांनी जे योगदान स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिले त्याचे स्मरण व जतन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत वर्तमान व पुढच्या पिढीसाठी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असेही यावेळी खासदार शरदचंद्र पवार यांनी सागितले आहे.
क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या रुपाने स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील : पालकमंत्री छगन भुजबळ
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लाखो लोकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचेही योगदान अविस्मरणीय व अतुलनीय असे आहे. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या रुपाने स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील. तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी खासदार शरदचंद्र पवार यांनी वेळोवेळी निधीची तरतूद केली. आदिवासी बांधव देशोधडीला लागणार नाही यासाठी वेळोवेळी काळजी घेतली. नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन लावण्यात येऊन जगभरातून येणाऱ्या नागरिकांना येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन करून देण्यात येईल. तसेच कळसुबाई शिखरावर रोप-वे च्या माध्यमातून आदिवासी भागातील पर्यटनालाही चालना देण्यात येईल.
आदिवासी शास्रज्ञांच्या संशोधनाला चालना दिली जाईल : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
यावेळी विधानसभा उपाध्यक्ष म्हणाले की, आदिवासी शिक्षणात अधिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यात किमान दोन ते तीन नवोदय विद्यालय येत्या काळात निर्माण
करण्यासोबतच आदिवासी बांधवांसाठी असलेलं बजेट पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी हा शास्त्रज्ञ आहे. संशोधन क्षेत्रात तेही प्रगती करू शकतात. त्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून ९ ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिन शासकीय पातळीवरही आदिवासी दिन म्हणून पाळला जावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रकृतीशी संघर्षाची प्रेरणा आदिवासींनी जगाला दिली : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रकृतीच्या विरोधात लढण्याची प्रेरणा आदिवासी बांधवांनी जगाला दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती कसे रहावे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आदिवासी बांधव आहेत. आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे यावेळी मंत्री श्री. आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार डॉ.किरण लोहमटे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश पैंदान यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात संतोष मुठे लिखित ‘आदिवासी क्रांतीपर्व’ व जगन खोकले यांच्या ‘रांगडा गडी’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी वासळी फाट्यावर उभारण्यात येणाऱ्या राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या आराखड्याचे सादरीकरण केले.
00000000000