अमरावती, दि. 15 : येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी वापर योजनांचा समावेश करावा. प्रत्येक घरी नळ जोडणी करुन सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी आरक्षणबाबत योजनांच्या आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सु.पा.आडे, उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.अं.सावंत, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाल्या, पाणी वापर संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. पाणी वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येण्यासाठी अपर वर्धा प्रकल्पाअंतर्गत येणारे सिंचनाचे पूर्ण क्षेत्रफळ पाणी वापर संस्थाना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आवश्यक ती कार्यवाही करून पूर्ण करावी. असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या गहू, कापूस, हरभरा इत्यादी पिकांकरिता मागणीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. रब्बी हंगामाचे सिंचन सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निम्न पेढी प्रकल्प अंतर्गत प्राप्त निधी मधून कालवे, बंधारे निर्मितीची नियोजित सर्व कामे गतीने पूर्ण करण्यात यावी असे सांगितले.
0000000