नंदुरबार, दि.14 (जिमाका वृत्तसेवा) : जामिया मिलीया हॉस्पीटल, अक्कलकुवा येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप पाडवी, मकराजी आरीफ, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी, उपाध्यक्ष हुसेफा गुलाब मोहम्मद वस्तानवी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, तहसिलदार सचिन म्हस्के आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, कोविड काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती. त्यामुळे या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टचा अक्कलकुवा तसेच धडगाव व मोलगी या भागातील जनतेला उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जामिया येथील शिक्षणाचे काम उत्कृष्ट असून जामियाने मेडीकल कॉलेजसाठी प्रयत्न करावा, त्यासाठी शासनामार्फत मदत करण्यात येईल. तसेच अक्कलकुवा तालुक्यात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जामियाचे उपाध्यक्ष वस्तानवी म्हणाले की, कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची पूर्तता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लान्टमधून होणार आहे. Human Concern Internationl (HCL) Canada यांनी हा ऑक्सिजन प्रकल्प जामिया संस्थेस दिला असून प्रकल्प उभारण्यासाठी 45 लाख रुपये खर्च झाला आहे. हा ऑक्सिजन प्रकल्प हवेतून ऑक्सिजन निर्मिती (पीएसए) प्रकारातील असून प्रति मिनिट 150 एलपीएम ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता असलेला प्लान्टमधून एकावेळी 30 रुग्णांना ऑक्सिजन पुरविता येईल. या प्रकल्पामुळे कोरोनावरील उपचारासाठी आणि इतरही प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा स्थानिक पातळीवर करणे शक्य होणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक तसेच जामिया शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.
000000
पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी आज अक्कलकुवा तालुक्यातील देहली येथील प्रकल्पाला भेट दिली व परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप पाडवी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, अधीक्षक अभियंता सु,स,खांडेकर, कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर, तहसिलदार सचिन म्हस्के, उपअभियंता किशोर पावरा, कनिष्ठ अभियंता विकास शिंदे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभाताई शिंदे, सरपंच बबलु पाडवी, चंदु पाडवी, ईश्वर तडवी आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, मी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे आलो असून आपल्या समस्या निश्चित सोडविल्या जातील असे त्यांनी सांगितले. आदिवासी विभागाने भूमिहिन दारिद्ररेषेखालील आदिवासींसाठी सबळीकरण व स्वाभिमान या योजनेअंतर्गत 4 एकरापर्यत जिरायती जमीन रू.5 लाख प्रति एकर या कमाल मर्यादित दराने व 2 एकरापर्यत बागायती जमिन रू.8 लाख प्रति एकर या कमाल मर्यादित दराने देण्याची दरतूद आहे. त्यानुसार 102 प्रकल्पग्रस्तांसाठी 163.20 हेक्टर जमीनीकरिता अंदाजित एकूण 8 कोटी 18 लाख 28 हजार 480 रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या भागातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा योजना, ग्रमापंचायत इमारत बांधकाम, स्मशानभूमी, समाजमंदिर, तसेच सांस्कृतिक भवनासाठी तसेच या भागातील विविध विकासकामांसाठी आदिवासी विभाग व जिल्हा नियोजन समितीमार्फत निधीची तरतुद करण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या सागाच्या घरांना घसारानुसार रक्कम देण्यात येईल. ज्या लोकांच्या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या आहेत. अशा प्रकल्पग्रस्तांना मच्छीमार सोसायटी स्थापन करण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल तसेच त्यांना मत्स्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.तसेच प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी लोकसंघर्ष मोर्च्याच्या प्रतिभाताई शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांना सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ मिळावा, भूमिहीन जमीन, घरकुल, मनरेगा, शेळीपालन, इत्यादी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याची मागणी केली.
प्रास्ताविकात श्री.चिनावलकर यांनी देहली प्रकल्पाविषयी माहिती दिली. यावेळी आंबाबारी, रायसिंगपूरा, दसरापादर, रतनबारा, रांझणी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिक व लोकसंघर्ष मोर्च्याचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
000000