वर्धा, दि.4 (जिमाका) : जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी मोहिम राबवावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुनील केदार यांनी केले.
वायफड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 6 कोटी 50 लक्ष रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, जिल्हा आरोग्य अधिकारी राज पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव, कार्यकारी अभियंता विवेक पेंढे, मनोज चांदुरकर, सुनिता चांदुरकर, सरपंच विजय राऊत, प्रफुल्ल कुचेवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र असले पाहिजेत परंतु ते नाहीत. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाणार असल्याचे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले. आरोग्य केंद्र नागरिकांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. या केंद्रात डॅाक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारीका तसेच आशा वर्कर या सर्वांनी चांगली सेवा देणे आवश्यक आहे. या ठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत हे सर्व कर्मचारी वर्ग चांगली सेवा देतील, असे पालकमंत्री म्हणाले.
समृध्दी महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रस्ते खराब झाले आहे. हे रस्ते संबंधित कंपनीचे दुरुस्त केले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातील. गावांचा विकास होतांना गावकरी व सरपंचांचे योगदान फार महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या गावात नेमकी कोणती विकासाची कामे झाली पाहिजे, यासाठी या लोकांनी प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. गावात पुरेसे पाणी उपलब्ध होतील, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, असे पुढे बोलतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आ.कांबळे यांनी वायफड आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक क्षेत्र येत असल्याचे सांगितले. लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य केंद्र कार्यरत असते त्यापेक्षाही महिलांची सुरक्षित आणि संस्थात्मक प्रसुती झाली पाहिजे, हा या केंद्राचा महत्वाचा उद्देश आहे. 200 खाटांच्या महिला रुग्णालयाला गती देण्यात येणार असल्याचे देखील आ.कांबळे यांनी सांगितले. समृध्दीच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मनोज चांदुरकर यांचे देखील भाषण झाले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.राज पराडकर यांनी केले. या आरोग्य केंद्राचा परिसरातील सहा उपकेंद्र, 18 ग्रामपंचायती, 24 गावे, 65 अंगणवाडी मधील 70 हजार नागरीकांना लाभ होणार असल्याते डॅा.पराडकर यांनी सांगितले. आभार माता व बालसंगोपण अधिकारी डॅा.नाईक यांनी मानले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थिर होते.