नागपूर, दि. 22 : हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योग-व्यवसायाला प्रचंड गती मिळणार आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांनाही या महामार्गाचा फायदा झाला पाहिजे, यासाठी हा महामार्ग या जिल्ह्यांपर्यंत वाढविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूरपर्यंत 210 किलोमीटर स्वतः वाहन चालवत श्री. शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली. यादरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार, वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.
शेलूबाजार येथून श्री. शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास स्वतः वाहन चालवत प्रारंभ केला. वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे त्यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातीलच वेरूळजवळ वन्यप्राण्यांना आवागमन करता यावे, यासाठी बांधण्यात आलेला वन्यजीव उड्डाणपूल, नागपूर जिल्ह्यात वायफळ येथील टोल प्लाझा व परिसर, तसेच नागपूर येथे ज्या भागातून महामार्गास प्रारंभ होतो, त्या भागाची सुद्धा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केली.
समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थाने विदर्भात समृद्धी येणार आहे. येथील औद्योगिकीकरणासह उद्योग-व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. महामार्गाचा विदर्भातील अन्य जिल्ह्यांनाही फायदा झाला पाहिजे, ही भूमिका समोर ठेवून हा महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. या महामार्गाच्या वाशिम जिल्ह्यातील शेलूबाजार ते नागपूर या पहिल्या टप्प्यातील 210 किलोमीटर मार्गाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या 2 मे रोजी लोकार्पण होणार आहे. जो मार्ग पूर्ण झाला आहे, तो सर्वसामान्यांसाठी खुला झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे या टप्प्याचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण महामार्ग वाहतुकीस खुला होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी आर्वी टोल प्लाझा येथे बोलताना सांगितले.
या महामार्गावर वाहने 150 च्या गतीने धावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेचीही पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघाताचे प्रमाण शून्य राहील. महामार्गावर तत्काळ प्रतिसाद पथके राहतील. मार्गाच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा इकोफ्रेंडली रस्ता असून मार्गाच्या दुतर्फा 11 लाख 30 हजार झाडे लावून ग्रीन कव्हर तयार करण्यात आले आहे. महामार्गावर आपण 250 मेगावॉट सौरऊर्जा तयार करतो आहोत. महामार्गाशेजारी एक हजार शेततळी तयार करण्यात आली असून या तळ्यातून दोन हजार 500 कोटी लिटर पाण्याचा साठा झाला. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
या संपूर्ण महामार्गावर वन्यप्राण्यांना आवागमनासाठी 76 अंडरपास तर 8 ओव्हरपास तयार करण्यात आले आहेत. यावर 300 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तसेच प्रवाशांना महामार्गावर ये-जा करता यावी, यासाठी 24 इंटरचेंजेस देण्यात आले आहेत. महामार्ग तयार करताना वृक्षारोपण, सौरऊर्जा, शेततळे, पर्यावरण, वन्यप्राणी, उद्योग, शेतकरी आदींचा विचार करण्यात आल्याने हा केवळ महामार्ग नाही तर लोकांच्या आयुष्यात समृद्धी आणणारा महामार्ग ठरणार आहे. विकासाच्या कोणत्याही प्रक्रियेत भूसंपादन अतिशय महत्वाचे असते. या महामार्गाचे महत्व लोकांना समजावून सांगितल्याने आणि पाचपट मोबदला दिल्याने वेळेत भूसंपादन होवू शकले. महामार्गावर नवनगरे उभारण्यात येणार असून त्याचेही काम गतीने होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.