राज्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 25 :- राज्यात गुन्ह्यांच्या प्रकटीकरणाचे प्रमाण 54 टक्के आहे. यामध्ये अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता असून यासाठी आगामी काळात राज्यातील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच विहीत कालमर्यादेत हे अहवाल येऊन दोषसिद्धीला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला श्री.फडणवीस यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी गृह विभागासह विविध विषयांचा आढावा सादर केला.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पोलिसांनी राज्यात ‘ऑपरेशन मुस्कान’ची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. यामध्ये या माध्यमातून गेल्या 7 वर्षात सुमारे 37 हजार 511 बालकांचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. जून अखेरपर्यंत राज्यात महिलांवरील अत्याचाराचे 22 हजार 509 गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांचे स्वरूप पाहिले असता 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हे हे परिचित लोकांकडून झाले असल्याचे आढळून आले आहे. महिला अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी केवळ कायदे करून चालणार नाही तर संपूर्ण व्यवस्थेचे समन्वयन करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे महिला अत्याचारावरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच समाज प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्याबरोबरच विक्रीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. युवा पिढीमध्ये वाढत असलेले अमली पदार्थांचे आकर्षण लक्षात घेता शाळा महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईमध्ये नव्याने सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल असे सांगून वाळू तस्करी रोखण्यासंदर्भात महसूल आणि पोलीस विभागाची एकत्र बैठक घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. लोकप्रतिनिधींनी आपले वर्तन उंचावण्याची आवश्यकता प्रतिपादित करून नियमबाह्य काम होत असेल तर कारवाई होणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत 1200 किमी चे डांबरी रस्ते असून येत्या तीन वर्षात मुंबई महानगरपालिकेअंतर्गत असलेले सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. राज्य महामार्गांवरील खड्डे येत्या डिसेंबरपर्यंत भरणार असल्याचे ते म्हणाले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, या प्रकल्पासाठी चार मजले जमिनीखालील जागा देण्यात येणार असून स्थानकांच्या जागेव्यतिरिक्त वरील उर्वरित जागा वापरावयास उपलब्ध होणार आहे. एक लाख कोटींच्या या प्रकल्पातील 81 टक्के निधी जपानच्या जायका कंपनीमार्फत उपलब्ध होणार आहे. यासाठी 0.1 टक्के व्याजदर असून सुरूवातीची 15 वर्षे परतफेड करण्याची आवश्यकता असणार नाही. या अनुषंगाने राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक होईल. मुंबईतील मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन ध्वनी आणि वायू प्रदूषणामध्ये घट होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, भाई जगताप, प्रसाद लाड, सचिन अहिर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, महादेव जानकर, अभिजीत वंजारी, सुनील शिंदे, नरेंद्र दराडे, राजेश राठोड, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, श्रीकांत भारतीय, अमरनाथ राजूरकर, सुरेश धस आदी सदस्यांनी सहभाग घेतला.