कलाविष्कारही ईश्वराची अर्चना समजून सादर करा -सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 12 : विविध कला सादरीकरणाद्वारे समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम ईश्वरी कार्य आहे. कलाकार मंडळींनी कलाविष्काराचे सादरीकरण ईश्वराची अर्चना समजूनच करावे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ईप्टाच्या 49 व्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री.मुनगंटीवार बोलत होते. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे, पुरातत्व संचालक डॉ. तेजस गर्गे, इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाट्य संघाच्या अध्यक्ष सुलभा आर्या, जनरल सेक्रेटरी मसुद अख्तर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अंजन श्रीवास्तव, रमेश तलवार, सचिन निंबाळकर यांच्यासह या नाट्य स्पर्धेत भाग घेतलेले विद्यार्थी  यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, कला अविष्कार सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे कठीण काम कलाकार मंडळी करतात. कोणत्याही कलाकाराला आपण सादर केलेल्या कलेतून आनंद मिळाला तरच त्याची कला सगळ्यांपर्यंत पोहोचेल. हे ईश्वरी कार्य करणाऱ्या कलाकारांचे स्थान समाजात अग्रस्थानी आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात आजच्या या नवीन कलाकारांनी आपापल्या कलेत स्वतःला वाहून घेऊन काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इंडियन पिपल्स थिएटर्स असोसिएशन (ईप्टा) अर्थात भारतीय जननाट्य संघ गेले अनेक वर्षे नाट्य स्पर्धा आयोजित करून नवीन कलाकार तयार करीत आहे याचा आनंद आहे. सांस्कृतिक कार्य विभाग अशा संस्थांच्या मागे उभा असून भविष्यातील उपक्रमांना श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

००००