धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता

मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी संदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव विजय वाघमारे, मार्केट फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर फेले, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके, सहसचिव सुधीर तुंगार, उपायुक्त पुरवठा व सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या धान व भरडधान्यांचे चुकारे कोणत्याही परिस्थितीत विहीत वेळेत अदा करावेत. क्षेत्रीय अधिकारी यांनी जनजागृती करून शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये याची खबरदारी घ्यावी, खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन धान खरेदी पोर्टलवर नोंदणी सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. धान खरेदी केंद्रांवर उपलब्ध करुन द्यावयाच्या पायाभूत सुविधांबाबत खबरदारी घ्यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचाही अवलंब करण्यात यावा. कृषी विभागामार्फत धान व भरडधान्य यांचे लागवड क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता याबाबतची अद्ययावत माहिती उपलब्ध करुन  घेण्यात यावी. पणन हंगाम 2022 – 23 मध्ये खरेदी होणाऱ्या धान व भरडधान्य साठवणूकीसाठी गोदामांचे तसेच गुणवत्ता नियंत्रणाचे व्यवस्थापन करण्यात येवून धान व भरडधान्य खरेदीकरिता बारदाना खरेदी व पुरवठा याबाबतचे व्यवस्थापन याबाबत विभागाने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारने खरीप पणन हंगाम 2022 – 23  करीता जाहीर केलेल्या आधारभूत किंमती पुढीलप्रमाणे. धान साधारण दर्जा 2040 रु. प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या धानाकरीता 2060 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. संकरित ज्वारीसाठी 2970 रु. तर मालदांडीसाठी 2990 रु. रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. बाजरी 2350, रागी 3578, मका 1962 रु. अशा किंमती निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

वृत्त: श्रीमती संध्या गरवारे/स.सं.

श्री. नारायणकर/उपसंपादक