नॅशनल गेम्स २०२२ : आज महाराष्ट्र महिला संघासमाेर हिमाचल प्रदेश तर पुरुष संघाची लढत तामिळनाडू टीमशी

मुंबई, दि. २६ :-  महाराष्ट्राचे महिला आणि पुरुष कबड्डी संघ आज साेमवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयी सलामी देत नवरात्रीचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्नेहल शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा महिला संघ सलामी देण्यासाठी उत्सुक आहे. यादरम्यान महाराष्ट्राच्या महिला संघाचा पहिल्या फेरीचा सामना हिमाचल प्रदेश टीमशी हाेणार आहे. तसेच महाराष्ट्र पुरुष संघासमाेर तामिळनाडू संघ असेल. त्यामुळे आता महाराष्ट्राचे दाेन्ही संघ आता या दाेन्ही सामन्यात विजयाची नाेंद करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

याच स्पर्धेच्या तयारीसाठी महाराष्ट्राच्या दाेन्ही संघांनी पुण्याच्या बालेवाडीत कसून सराव केला आहे. त्यामुळे आता तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे संघांचे विजयासाठीचे पारडे जड आहे.

साेनाली, स्नेहलवर मदार : महाराष्ट्र महिला संघाच्या विजयाची मदार ही साेनाली शिंगटे आणि कर्णधार स्नेहलवर असेल. इंटरनॅशनल रेडर साेनाली ही बाेनस गुण संपादन करण्यात तरबेज आहे.