डिसेंबर अखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया तर २६ जानेवारीला नियुक्तीपत्र देणार
नाशिक: दिनांक ६ (जिमाका वृत्तसेवा ) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार नोकऱ्या देण्याचा शासनाचा मानस असून त्यातील अनुकंपा भरती हा अत्यंत संवेदनशील व प्राधान्याचा विषय आहे. डिसेंबर 2022 अखेरपर्यंत अनुकंपा भरतीची प्रक्रिया व २६ जानेवारी २०२३ रोजी नियुक्तीपत्रे देण्यासह शासन आपल्या दारी’व ‘महाआरोग्य’अभियान जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आज पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा भरती, महाआरोग्य अभियान नियोजन व शासन आपल्या दारी अभियानांच्या आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकांसाठी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौघुले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, मालेगांव वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोजकुमार, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, नाशिकचे तहसीलदार अनिल दौंडे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या रिक्त पदांचा आढावा घेऊन अनुकंपाच्या नियुक्तीची पदे निश्चित करावी. उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करून घोषित करावी. प्रत्येक विभागाने आपल्याकडील अनुकंपाची रिक्त पदे शैक्षणिक अर्हतेनुसार तपासून तातडीने भरावीत. विभागवार प्रतिक्षा यादीनुसार पदे भरून झाल्यानंतर उर्वरित
प्रतिक्षा यादीतील उमेदवार जिल्हा समितीकडे पाठवून समितीने त्यासाठी शिबिरे, समुपदेशन सत्रांचे आयोजन करून भरती प्रक्रिया पूर्ण करावी. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात एकही अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतिक्षेत राहणार नाही, याची काळजी घ्यावी. या भरतीच्या माध्यमातून रोजगाराची संधी आपण गरजू व वंचित उमेदवारांना मिळवून देण्याच्या सामाजिक जाणिवेतून हे काम प्रत्येक विभागाने हाती घ्यावे, असेही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
‘महाआरोग्य अभियान’गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवावे
‘महाआरोग्य अभियान’हे गरजू रूग्णांपर्यंत पोहोचवण्याचा मानस असून या अभियानाचा एक भाग म्हणून जिल्ह्यात महानगरपालिका व ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात यावीत, अशा सूचना आज पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले, या शिबिरांसाठी स्वतंत्र लोगो तयार करून संकेतानुसार त्याची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जनजागृती करण्यात यावी. महात्मा फुले जनआरोग्य अभियानात जिल्ह्यात ५९ रुग्णालये असून कोणत्या आजारांवर कुठे उपचार होणार आहे याबाबतचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. या नियोजनात स्वयंसेवी संस्थांनाही सहभागी करून घ्यावे. महात्मा फुले जनआरोग्य अभियान व गोल्डन कार्डांचेही वितरण या मोहिमेत करावे. आशा वर्कर्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्यविषयक सर्वेक्षण कण्यात यावेत. रूग्णांचे स्क्रिनिंग करून प्रत्येक रूग्णाला आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच क्रिटीकल असणारी शस्रक्रिया प्रसंगी मोठ्या शहरातील रूग्णालयांमध्ये रेफर करावीत.
महाआरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून एकाचवेळी योजनांचा लाभ द्यावा
महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी. विविध योजनांचा लाभ व दाखले एकाच वेळी एकाच कार्यक्रमातून लोकांना व लाभार्थ्यांना मिळण्यासाठी नियोजन करण्यात यावे. दाखल्यांसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी बनवून महत्त्वाच्या योजनांच्या प्राधान्यक्रम ठरवून गावनिहाय त्यास प्रसिद्धी देण्यात यावी. या मोहिमेत दिव्यांगांच्याही योजनांचा आवर्जून समावेश करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्या आहेत.
0000000000