वारकरी संप्रदायातील संत महाराष्ट्राचे वैभव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 18 : संत तुकाराम महाराजांच्या गाथा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम संताजी जगनाडे महाराजांनी केले. मानवतेचा विचार त्यामधून पुढील पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम संतांनी केले असून वारकरी संप्रदायातील संत हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज 18 डिसेंबर रोजी नंदनवन भागातील ग्रेट नाग रोडवरील संत जगनाडे चौकात श्री. संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी पर्वावर श्री. संताजी आर्ट गॅलरीचे भूमिपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, अभिजीत वंजारी, प्रविण दटके, मोहन मते, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, रमेश गिरडे, बाबुराव वंजारी, स्वामी भद्रे, उमेश शाहू व स्वप्नील वरंभे यांची उपस्थिती होती.

संतांच्या आध्यात्मिक विचारातून मानवी जीवन कसे बदलू शकते हे दिसून येते. ते केवळ संतच नव्हते तर समाजसुधारक होते. समाजातील चालीरिती बदलवून समाजातील विषमता दूर करून समाज पुढे गेला पाहिजे. संतांनी दिलेला विचार हा शाश्वत आहे. सशक्त समाज निर्मितीसाठी संतांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. संत जगनाडे महाराजांच्या सौदुंबरे या जन्मभूमी व कर्मभूमीचा विकास करण्यासाठी 60 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूचे जतन करणार असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, त्या माध्यमातून संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत आपणाला पोहोचावे लागतील. संत जगनाडे चौकातील हे स्मारक मोठ्या स्वरूपातील व्हावे यासाठी आमदार श्री. बावनकुळे आणि आमदार श्री. खोपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या स्मारकासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या. या आर्ट गॅलरीसाठी लागणारा आवश्यक तो निधी मार्च 2023 पूर्वी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही यावेळी श्री. फडणवीस यांनी दिली.

संत जगनाडे महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येत आहे. त्यांच्यावर काही वर्षापूर्वी डाक तिकीटाचे अनावरण करण्यात आले. समाजाला उर्जा देण्याचे काम संतांच्या विचारातून होत आहे, असे खासदार तडस यांनी सांगितले.

संत जगनाडे महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे आहे. संताच्या विचारावर प्रत्येकाने आपली वाटचाल करून समृध्द करावे. श्री. संताजी आर्ट गॅलरीतून संत जगनाडे महाराजांच्या जीवनकार्याची माहिती पहायला मिळणार असल्याचे श्री. बावनकुळे म्हणाले.

श्री. पठाण म्हणाले, वारकरी संप्रदायाचे राज्यावर मोठे उपकार आहे. देशातील समाज रूढी परंपरा, जातीपातीत असतांना त्यांचा स्वाभिमान जागवून त्यांचे प्रबोधन करण्याचे काम संतांनी केले. तुकाराम महाराजांच्या गाथा समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम संत जगनाडे महाराजांनी केले. बहुजन समाजाला अध्यात्माची दारे उघडे ठेवण्याचे काम संतांनी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. श्री. खोपडे, श्री. क्षीरसागर यांनीही विचार व्यक्त केले.

प्रास्ताविकातून माहिती देताना नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले, ही आर्ट गॅलरी 8 हजार स्के.फुट जागेवर बांधण्यात येणार आहे. 1 कोटी रूपये निधी उपलब्ध झाला असून साडेसहा कोटी रुपये खर्च या गॅलरीवर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविला. श्री. फडणवीस यांनी संत जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. संताजी आर्ट गॅलरीचे आर्किटेक्ट स्वप्नील वरंभे यांचा श्री. फडणवीस यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाला तैलिक समाज बांधवांची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार ज्योती भगत यांनी मानले.